खारघरमधील उद्याने महापालिकेकडून दुर्लक्षित

नागरिकांमधून संताप व्यक्त

। पनवेल । वार्ताहर ।

खारघर, सेक्टर 12 मधील उद्यानामध्ये खेळत असताना सिमेंटचा बाकडे अंगावर पडून चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतरही उद्यान विभाग अद्यापही झोपेत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. उद्यान, मैदान आणि पदपथावरील मोडकळीस आलेली सिमेंटची बाकडी हटवावीत, अशी मागणी खारघरवासियांकडून केली जात आहे.

खारघर परिसरात सिडकोने विविध भागांमध्ये असलेल्या लहान-मोठे उद्यान आणि मैदान उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, महापालिकेकडून देखभाल होत नसल्यामुळे अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक मैदाने आणि उद्यानांतील सिमेंटची बाकडी मोडकळीस आली असून, जैसे थे पडून आहेत. खारघर, सेक्टर-12 मध्ये बळवंत फडके मध्यवर्ती उद्यान मोठे आणि खेळणी असल्यामुळे तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची नेहमी वर्दळ असते. मात्र, उद्यानात काही ठिकाणी सिमेंटच्या बाकड्यांचे सांगाडे दिसून येत आहेत. तसेच सभोवती मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. याच उद्यानाच्या बाजूला नाला असल्यामुळे उद्यानात अनेक वेळा विषारी साप नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. अशीच अवस्था सेक्टर 21 हावरे स्प्लेंडर इमारती शेजारीला असलेल्या उद्यानाची झाली आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. सिमेंट बाकडे जमिनीला टेकले आहेत. तर काहींचे सांगाडे दिसत आहे. शिल्प चौकलगत असलेल्या उद्यानातील सिमेंटच्या बाकड्यांना तर भेगा पडल्या आहेत. सेक्टर-12 मधील उद्यानासारख्या दुर्घटनेची पुनरावृती पुन्हा होऊ नये यासाठी शहरातील मैदान आणि उद्यानाकडे महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

खेळाच्या मैदानाचे झाले वाहनतळ
खारघर सेक्टर 12 मधील प्लॉट क्र. 110 बीयूडीपी वसाहतीत सिडकोने खेळाच्या मैदानाची निर्मिती केली आहे. मात्र, या मैदानाला सध्या वाहनतळाचे स्वरुप आले आहे. परिसरातील रहिवासी चार चाकी वाहने, दुचाकी, मालवाहू टेम्पो उभे करीत असल्यामुळे मैदानाला वाहनतळाचे स्वरुप आले आहे. मैदानाचे वाहनतळ महापालिकेच्या उद्यान आणि प्रभाग अधिकाऱ्यांना दिसत नसावे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सिडकोने खारघरमध्ये सेक्टरनिहाय छोटी-मोठी उद्याने आणि मैदाने उभारुन माळी कामगारांकडून देखभाल केली जात असे. मात्र, खारघर विभाग महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर उद्यानातील कामासाठी माळी कामगार अथवा उद्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी एजन्सीची नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र, महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. खारघरमधील एकही उद्यान आणि मैदानाच्या देखरेखीसाठी माळी कामगारांची नियुकी केली नसल्याचे उद्यान विभागाकडून समजले.

खारघरमधील उद्यान, मैदान देखभाल-दुरुस्तीच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, त्यापूर्वी कामगार लावून मैदानातील गवत काढले जाईल.

राजेश कर्डीले, उद्यान अधिकारी, पनवेल महापालिका
Exit mobile version