बांगलादेशची संसद बरखास्त

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर बांगलादेशाची संसद विसर्जित करण्यात आलेली आहे. राष्ट्राध्यक्ष मोहमद शहाबुद्दीन यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बांगलादेशातील आंदोलनामागे असलेल्या विद्यार्थी संघटनांनी देशात लष्करी शासन लागू करण्यास विरोध केला आहे.

राष्ट्राध्यक्ष शहाबुद्दिन यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, नागरी संघटना, विद्यार्थी संघटना, लष्कर यांच्याशी चर्चा केल्यानंतर संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशाच्या संसदेने अधिकृतरित्या पत्रक प्रसिद्ध करत ही बातमी दिली आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केले. यामुळे बांगलादेशातील त्यांची 15 वर्षांची राजवट अचानक संपुष्टात आली असून, लष्करप्रमुखांनी लवकरच हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हुल्लडबाजांनी ढाकाच्या दिशेने कुच केली आणि पंतप्रधान निवासस्थावर हल्ला चढवला. दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यामुळे बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून, सध्या त्या भारताच्या आश्रयास आल्या आहेत.

बांगलादेशातील महत्त्वाचा विरोधीपक्ष असलेल्या बीएनपीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आलेली आहे. दरम्यान, बांगलादेशातील घटनेनुसार संसद विसर्जित केल्यानंतर 90 दिवसांत सर्वसाधारण निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. तर लष्कराकडे सत्ता सोपवण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध केलेला आहे. नोबल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहमद युनुस यांनी सरकारचे नेतृत्त्व करावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. बांगलादेशात लोकशाही परतणं गरजेचं आहे आणि या संकटकाळात भारताने पाठीशी खंबीर उभं राहावं असं मत नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे. मोहम्मद युनूस हे बांगलादेशमधील हंगामी सरकारचे सल्लागार असतील अशी चर्चा आहे. त्यांनी त्यासाठी होकारही कळवलाय, अशी माहिती आहे. बांगलादेशात निवडणूक प्रक्रियेतून शेख हसिना यांनी अन्य विरोधी पक्षांना डावललं, त्यामुळेच ही स्थिती आली, असं मत मोहम्मद युनूस यांनी व्यक्त केलं आहे.

अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले
बांगलादेशात हिंसक आंदोलकांनी आता हिंदूना लक्ष्य केलं आहे. हिंदूंची घरं आणि मंदिरांची तोडफोड केली जातेय. बांगलादेशातील नंदीपार बोरो बट ताला भागात आंदोलकांनी हिंदूच्या घरावर हल्ला केला. घरातील साहित्याचं तोडफोड करून पैसे आणि दागिण्याची लूट करण्यात आली आहे. हिंसक आंदोलकांनी इस्कॉन मंदिराचीही तोडफोड केली आहे. दरम्यान, भारताने बांगलादेशातील भारतीय नागरिकांना सुरक्षास्थळी राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
Exit mobile version