| चिपळूण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला आता कुठे वेग येत होता. अशातच सोमवारी सकाळी 8.30 वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले. यावेळी जोरदार आवाज झाला. त्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिक भयभीत झाले. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा देखील हबकून गेली आहे. या पुलाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनीही तेथुन पळ काढला. तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणातील किमान एकेरी वाहतूक सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प्रयत्न केले. मात्र या कामी तितकेसे यश आले नाही. अजूनही एकेरी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. परंतु गेल्या महिनाभरात चिपळूण हद्दीत कामाचा वेग वाढला होता. विशेषतः शहरातील बहादूर शेख नाक्यातील उड्डाण पुलाच्या कामाला चांगली गती मिळाली होती. सुरुवातीला शहरातून जाणारा 1.85 किलोमीटर अंतराचा हा उड्डाण पूल उभारताना अनेक अडचणींना सामना करावा लागला. या पुलांतर्गत एकूण 46 पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरू केले . वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाका दरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर नुकतेच अतिशय मुख्य नाक्यातील अवघड टप्प्यात काम सुरु केले होते.
पुलाचे काम करणारी क्रेन देखील पूर्णपणे खराब झाली आहे.गेली अनेक वर्षे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. मात्र अखेर संथगतीने का होईना महामार्गाचे काम सुरू होते. मात्र आता बहादुरशेख नाक्यातील उड्डाणपुलाचा काही भागचं खाली कोसळल्यामुळे हा पूल उचलायला पुन्हा किती कालावधी लागतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.