शेकापच्या अमृतमहोत्सवी मेळाव्यात सहभागी व्हा – आ. बाळाराम पाटील

| रोहा | प्रतिनिधी |
देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच शेतकरी कामगार पक्षाचा देखील अमृतमहोत्सवी वर्धापनदिन  2 ऑगस्टला  पेण तालुक्यातील वडखळ येथे संपन्न होणार आहे.पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळत असते.आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहणे गरजेचे असून मोठ्या संख्येने वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा असे आवाहन  आमदार बाळाराम पाटील यांनी रविवारी ( 17 जुलै)  रोहा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना केले आहे.

याप्रसंगी माजी आमदार पंडीत पाटील, धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, नृपाल पाटील,सुरेश खैरे, देवा पेरवी,संतोष जंगम,गणेश मढवी,शंकरराव म्हसकर,कांचन माळी, श्रेयसी गांगल,नंदकुमार म्हात्रे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचे तालुका चिटणीस राजेश सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनंता वाघ यांनी प्रास्ताविक केले.

माजी आमदार पंडित पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाने राज्यातील श्रमजीवी जनतेसाठी दिलेले विविध लढे केलेली आंदोलने याची माहिती भावी पिढ्याना सांगितली पाहिजे असे मत व्यक्त करतानाच शेकाप हा विचारवंतांचा पक्ष आहे.पक्षात चढउतार होत असतात पण पक्षाचा विचार संपत नसतो असे कार्यकर्त्यांना सांगितले.

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन आहेच. पण दि बा पाटील हे शेकापचे नेते होते हे भावी पिढीला सांगितले पाहिजे. सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थिती मध्ये देखील शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता कोणत्याही बंधनाशिवाय किंवा प्रतिज्ञापत्राशिवाय पक्षाच्या सोबत आहे हीच शेकापच्या विचारांची ताकद आहे असे सांगतानाच योग्य वेळ येताच राजकीय भूमिका घेऊ असे सांगत राजकीय विरोधकांना संभ्रमात ठेवले आहे.
पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी वर्धापनदिन कार्यक्रमाला येताना कशा प्रकारे सर्वांनी यायचे आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच वर्धापनदिन कार्यक्रमाच्या सूक्ष्म नियोजनासाठी गावोगावी जाऊन बैठका घेण्याच्या सूचना तालुका चिटणीस मंडळाला दिल्या आहेत.

Exit mobile version