पनवेल ते अलिबाग रस्त्यावर तब्बल ७ हजार ५०० लाल बावटे
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा 75 वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु असून भव्य दिव्य स्वरुपात साजर्या होत असलेल्या या अमृतमहोत्सवी वर्धापन दिन ऐतिहासिक ठरणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 90 हजार स्न्वेअर फूट आकाराचा वॉटरप्रुफ शामियाना तयार करण्यात आला आहे. तर 2 हजार 500 आकाराचे व्यासपिठ साकारण्यात आले आहे. 30 हजार आसन क्षमता असलेल्या या भव्य शामियानात अद्यावत ध्वनी यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वर्धापन दिनाच्या आयोजनाकडे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार धैर्यशिल पाटील, जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील यांच्यासह प्रमुख नेते कार्यकर्ते लक्ष देऊन आहेत.
कोरानामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर प्रथमच शेकापक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असल्याने त्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा चिटणीस मंडळाच्या प्रत्येक तालुक्या तालुक्यात आणि गावोगावी झालेल्या आढावा बैठकांमुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक संख्येने प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते या वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 30 हजाराहून अधिक संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सोहळ्याचे महत्व लक्षात घेऊन रायगडचे पोलिस दल देखील सुरक्षेची काळजी घेत आहेत.
वडखळ येथील मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलानजिक भव्य दिव्य शामियाना साकारण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल 90 हजार स्न्वेअर फूट आकाराचा वॉटरप्रुफ शामियाना तयार करण्यात आला आहे. तर 2 हजार 500 आकाराचे व्यासपिठ साकारण्यात आले आहे. 30 हजार आसन क्षमता असलेल्या या भव्य शामियानात अद्यावत ध्वनी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पोलिसांच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व नियोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणाहून हजेरी लावणार्या कार्यकर्त्यांच्या पार्किंगसाठी 7 ते 8 हजार वाहने उभी करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
शेकापक्षाचे कार्यकर्ते मोठया उत्साहात वर्धापनदिनासाठी सज्ज झाले असून गावोगावी कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांवर तसेच वाहनांवर लाल बावटे फडकावले आहेत. तसेच रस्त्या रस्त्यांवर दुतर्फा वर्धापन दिनाला शुभेच्छा देणारे फलक तसेच लाल बावटे फडकवण्यात आले आहेत. अमृतमहोत्सवी वर्धापन दिन असल्याने पनवेल ते अलिबाग मार्गावर तब्बल 7 हजार 500 लाल बावटे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपुर्ण जिल्हा लाल बावटेमय झाला आहे.
असा होणार कार्यक्रम
प्रस्तावित डोलवी एमआयडीसी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रमुख पाहूण्यांची पारंपारिक वाहनांवरुन सवाद्य मिरवणूक काढून समारंभ स्थळी आगमन होईल. त्यानंतर क्रांती मशालीचे प्रज्वलन करण्यात येईल. लाल झेंड्याचे ध्वजारोहण करुन ध्वजगीत सादर केले जाईल. व्यासपिठावर पाहुण्यांचे आगमन होईल. त्यानंतर वीरगीत सादर करण्यात येईल. आ. बाळाराम पाटील श्रद्धांजली व दुखवटयाचा ठराव मांडतील. स्वागत माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील करतील अहवाल वाचन. त्यानंतर धैर्यशिल पाटील, आपचे नेते मंत्री गोपाळ राय, शेतकरी संघटनेचे नेते मा. खा. राजू शेट्टी आणि सर्वात शेवटी आ. जयंत पाटील मार्गदर्शन करतील. तर सुरेश खैरे जिल्हा चिटणीस मंडळ जाहीर करुन समारोपाचे भाषण करतील. राष्ट्रगीताने वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप होईल.
शेकापचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन ऐतिहासिक होणार असून 75 वर्षांपूर्वी आळंदी येथे शेकापची स्थापना झाली होती. वर्धापनदिनाची सुरुवात 2 ऑगस्टला वडखळ, ता. पेण येथे होईल. तेथून कार्यकर्ते महाराष्ट्रभर जाऊन तीन ऑगस्टला सायंकाळी या वर्धापन दिनाचा समारोप होईल. सांप्रतच्या राजकारणामध्ये 75 वर्षांपूर्वी जी परिस्थित होती. तीच परिस्थिती उद्भवते का अशी भीती वाटते. त्या दृष्टीकोनातून पक्षाचा विचार, पक्षाची बांधिलकी, पक्षावर असलेली हजारो कार्यकर्त्यांची निष्ठा आपल्याला अबाधित ठेवून पुन्हा आपल्या महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी कामगारांच्या उन्नतीसाठी आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त तमाम कार्यकर्त्यांना शुभेच्छा.
– आ. जयंत पाटील, सरचिटणीस शेकाप
वर्धापन दिनाला अधिकाधिक संख्येने यावे. श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचे धोरण कशा पद्धतीने राबवावे, आणि सक्तीने चाललेल्या भूसंपादनाच्या विरोधामध्ये कोणत्या पद्धतीची पावले उचलून शेतकर्यांना सुरक्षित करायचे अशा पद्धतीचे निर्णय यावेळी घेतले जाणार आहेत. अधिकाधिक मोठया संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहोत.
– धैर्यशील पाटील, माजी आमदार
शेकापचा वर्धापनदिन साजरा होणार आहे.या मेळाव्यास महिला.युवकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.शेकाप हा सर्वसामान्यांसह महिला, युवकांचा विचार करणारा एकमेव पक्ष आहे.तो सर्वांच्या मागे ठाम उभा राहतो.
– चित्रलेखा पाटील, महिला आघाडीप्रमुख