| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील विविध सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. अनेक अंतर्गत रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागली. शाळा सुटण्याच्या वेळेतही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी दुचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नालेसफाईची कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात सखल भाग जलमय झाल्याने नालेसफाईच्या कामांच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी तातडीने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याबरोबरच प्रभावी नालेसफाई व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.






