पक्षप्रमुखांचा आदेश माझ्यासाठी अंतिम – सुरेंद्र म्हात्रे

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग, पनवेल आणि पेण या तीन जागा सोडल्याने या तिन्ही जागांवरील त्यांचे उमेदवार माघार घेतील, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. अलिबाग मधून ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.28 ऑक्टोंबर रोजी ए.बी फॉर्म सुपूर्द केला व म्हात्रे यांना निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते.

आज दि.4 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा ठाम विश्वास ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. मागील चार दिवसांपासून ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उमेदवारांच्या संपर्कात असून त्यात त्यांना यश आल्याने या उमेदवाराने अर्ज मागे घेतले आहेत.

यावेळी सुरेंद्र म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, मी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता, दाखल केलेला अर्ज महाविकास आघाडी तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून केला होता. परंतु आज महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात ठरल्यानंतर मला पक्षप्रमुखांनी फोन केला व अर्ज मागे घेण्यास सांगितले. ज्यांनी मला बोलावून अर्ज भरायला सांगितला, त्यांनीच अर्ज मागे घ्यायला सांगितला म्हणून मी अर्ज मागे घेतला आहे. पुढील येणारा मातोश्रीचा आदेश मला मान्य असेल, आम्ही पक्षात आलो मूळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनीच त्यामुळे त्यांचा जो आदेश आहे, तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जो मातोश्री व पक्षप्रमुखांचा आदेश असेल तोच सर्व कार्यकर्त्यांचे असेल, व त्यांनाच ठाकरे पक्षाचा पाठिंबा असेल.

Exit mobile version