वंचितकडून अफसर खान मैदानात
| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
काँग्रेस नेते तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांनी मंगळवारी (दि.2) सकाळी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदार संघातून वंचितने खान यांना उमेदवारी घोषित केली. सर्वप्रथम एमआयएमतर्फे पुन्हा इम्तियाज जलिल यांना उमेदवारी दिली. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीकडून शिवसेना नेते ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना यांच्या यादीचे अद्याप ठरले नाही.
अशा परिस्थितीत वंचितच्या भूमिकेकडे लक्ष होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी घाई-घाईत खान यांचा वंचितमध्ये प्रवेश सोहळा उरकण्यात आला. यावेळी खान यांनी भूमिका व्यक्त करताना अॅड. प्रकाश आंबेडकर हे सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीने लढणार असे सांगितले होते. पत्रकार परिषदेनंतर खान यांनी कार्यकर्त्यांसह थेट अकोला गाठून अॅड. आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी वंचितच्या पाच जणांच्या यादीत छत्रपती संभाजीनगरसाठी खान यांना उमेदवारी जाहीर झाली. म्हणजे लोकसभेच्या तिकिटावर शिक्कामोर्तब करुनच अफसर खान वंचितमध्ये आल्याचे स्पष्ट झाले.