इशान किशनला संघात स्थान नाही
| नवी दिल्ली | वार्ताहार |
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवारपासून (11 जानेवारी) सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली परतले आहेत. दोघेही नोव्हेंबर 2022 नंतर प्रथमच टी-20 संघात परतले आहेत. दोन अनुभवी खेळाडू परतले, पण टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला संघात स्थान मिळवता आले नाही. मागील मोसमात त्यांनी मानसिक थकव्याचे कारण देत खेळण्यास नकार दिला होता, मात्रा याच कालावधीत तो दुबईमध्ये पार्टी करत असल्याचे समोर आले.
इशान किशनने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वर्ल्ड कप 2023 नंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी इशान किशन हा भारतीय संघाचा भाग होता. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली.
यानंतर तो दक्षिण आफ्रिका टी-20 दौर्यावर भारतीय संघाचा भाग होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. इशान किशन मानसिक थकव्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौर्यावरून परतला होता. इशान किशनला संघात ठेवल्यानंतरही त्याला खेळण्याची संधी मिळत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे तो कदाचित नाराज आहे. यादरम्यान इशान किशनच्या दुबईमध्ये पार्टी केल्याची बातमी समोर आल्याने त्याचे टेन्शन आणखी वाढले आहे.
खरंतर, इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, मानसिक थकवा आणि सतत प्रवास केल्यामुळे ईशान किशनला ब्रेक घ्यायचा होता. सूत्राने सांगितले की, ईशानने निवडकर्त्यांना विनंती केली होती की तो मानसिकदृष्ट्या थकलेला आहे आणि त्याला काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा आहे. आणि कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. निवडकर्त्यांनी इशानची विनंती मान्य केली आणि त्याला ब्रेक देण्यात आला.
ब्रेक मिळाल्यानंतर तो दुबईत पार्टी करताना दिसला. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इशान किशन तयार असल्याचेही वृत्त होते. मात्र यावेळी निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या मालिकेचा भाग नाहीत. असे असूनही ईशानची संघातून अनुपस्थिती थोडं आश्चर्यकारक आहे. यावरून हे समजू शकते की कदाचित बीसीसीआय इशान किशनच्या वृत्तीवर नाराज आहे.





