प्रवाशांनी भरलेली एसटी चालवली दारू पिऊन
| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे कायमच बोलले जाते. मात्र, अलिबाग एसटी बस आगारातील चालकाच्या निष्काळजीपणामुळे हाच प्रवास जीवघेणा ठरला असता. दसऱ्याच्या पुर्वसंध्येला प्रवाशांनी भरलेली एसटी बस चालक दारु पिऊन चालवित होता. चुकीच्या मार्गाने वाहन चालवित असल्याचा प्रकार उघड झाल्यावर चालकाचा प्रताप समोर आला. प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यावर चालक बसमधून उतरून गायब झाला. त्यामुळे बुधवारी रात्री प्रवाशांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहचण्यास विलंब झाला. या घटनेने एसटीतील प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलिबाग स्थानकातून बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महाजनेकडे एसटी बस निघाली. या एसटीमध्ये 50 हून अधिक प्रवासी बसले होते. स्थानकातून एसटी बाहेर निघतानाच चालकाचा गाडीवरील ताबा सुटत होता. जकात नाका येथे आल्यावर रोहा मार्गावर गाडी वळविण्या ऐवजी चालकाने बस पेण मार्गाकडे वळवली. त्यावेळी प्रवाशांनी गोंगाट केला. चालकाची प्रकृती बरी नाही, असे वाहकाने सांगत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केला. अखेर एसटी रेवदंडा बायपास रस्त्याकडे वळवण्यात आली. त्यानंतर रोहा मार्गाकडे बस निघाली. परंतु, चालकाचा त्याच्या स्टेअरिंगवरील ताबा सतत सुटत होता. कोपऱ्यातून गाडी चालवित होता. त्यामुळे रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या गवत झुडपाला घासत गाडीला पुढे चालक घेऊन जात होता. अखेर बेलकडेजवळ गाडी आल्यावर प्रवाशांनी चालकाच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. एका प्रवाशाने चालकाकडे जाऊन विचारून केली असता, दारु घेतल्याचा वास येऊ लागला. प्रवाशांचा संताप अनावर झाला. अखेर मद्यधुंद चालकाने बस मधून उतरून पळ काढला. त्यामुळे प्रवासी बेलकडे येथे ताटकळत राहिले. अखेर अर्धा तासाने दुसरा चालक आल्यावर प्रवासी त्यांच्या मार्गस्थ निघाले.
अलिबाग एसटी बस आगारातील चालकाच्या या मनमानी व निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबाग एसटी बस आगारातील गलथान कारभार या घटनेनंतर अधिक उघड झाला आहे.अलिबाग एसटी बस स्थानकात असलेले खड्डे, अपुरे कर्मचारी, बसची समस्या कायमच भेडसावत असताना याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
