एसटीच्या खात्यात 300 कोटींचा महसूल
| रायगड | प्रतिनिधी |
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीतील आकडेवारीनुसार एसटी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत.
या चार महिन्यांत एसटीला डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून 300 कोटींचा महसूल मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025मध्ये एकूण सुमारे 49.79 लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून 64 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबरमध्ये ही संख्या वाढून 77.32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तर नोव्हेंबर 2025 मध्ये यूपीआय व्यवहारांमधून सुमारे 78.66 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद करण्यात आली. डिसेंबर 2025 मध्येही हीच वाढ कायम राहिली असून, एकूण सुमारे 62.59 लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून 83.67 कोटी रुपये महसूल एसटीच्या खात्यात जमा झाला.
एसटी महामंडळाने बसस्थानकांवर, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रकमेचा व सुट्टे पैसे ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. अर्थात, त्यामुळे सुट्ट्या पैशावरून वाहकांशी होणाऱ्या अनावश्यक वादविवादाला पूर्णविराम मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. एसटीच्या काही वाहकांकडून होणारा पैशांचा अपहार रोखण्यासाठीदेखील डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत आहे. येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.







