रविवारी प्रवास वाटतो नकोसा
। कोलाड । प्रतिनिधी ।
थंडीचा मोसम सुरु झाला असून, सलग शनिवार- रविवार सुट्टी असल्यामुळे या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक कोकणात येतात आणि सर्व सुट्टीचा आनंद लुटून रविवारी परतीच्या प्रवासाला निघतात. परंतु, या परतीच्या प्रवासात कोलाड- खांब येथील अपूर्ण रस्त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी वर्गाला वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागला आहे. वाहतूक कोंडीचा तिढा सुटत नसल्यामुळे रविवार दिवस नकोसा झाला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवार दि.15 व रविवार दि.16 नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे येथून असंख्य पर्यटक कोकणातील पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, गडकिल्ले येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सहकुटूंब, मित्रपरिवारासोबत आले होते. सर्व सुट्टीचा आनंद घेत असंख्य पर्यटक एसटी बस, खासगी बस, फोरव्हीलर, व इतर वाहनाने परतीच्या प्रवासाला निघाले. परंतु, परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांना कोलाड- खांब येथील अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. खांब- कोलाड येथील अपूर्ण रस्ता हा प्रवाशांसाठी डोके दुखी ठरत आहे. या मार्गांवर रविवारी रात्री आठ वाजता येथे 3 ते 4 किलोमीटरवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोलाड पोलिसांच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
18 वर्षांपासून काम सुरु
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील चौपदरी करणाचे काम गेली 18 वर्षांपासून सुरु असून, अद्याप हे काम पूर्ण होई ना? या महामार्गाचे काम लोकसभा व विधानसभा मतदानपूर्वी जोरदार सुरु होते. परंतु, मतदाना नंतर हे काम मंदावले आहे. हे चित्र फक्त मतदानापुरते मर्यादीत होते असे भासविण्यात आले.







