। खेड । प्रतिनिधी ।
दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असून, घराबाहेर जाणे नकोसे झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, नोकरी, व्यवसाय, लग्नसराई आणि महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर जावेच लागते. त्यातही एसटी बसने प्रवास करणे त्रासाचे ठरत असतानाच महामार्गावर निवारा शेड नसल्याने भरउन्हात गाडीची वाट पाहण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. खेड तालुक्यातील आवाशी-गुणदे फाटा येथील बसथांब्यावर सध्या निवारा शेडविना प्रवाशांचे हाल होत आहेत.
आवाशी-गुणदे फाटा येथील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंडरपास असणे गरजेचे असल्याचे बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या लक्षात आले. याआधी औद्योगिक वसाहत व येथील संबंधित ग्रामस्थांनी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मागील वर्षअखेरीस कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, चार महिने लोटले तरी अद्यापही काम सुरूच आहे. परिणामी खेड व चिपळूण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या बसथांब्यावर दोन्ही बाजूस 4 महिने लोटले तरी अंडरपासचे काम सुरु आहे.
प्रवासी, विद्यार्थी यांना बस तसेच अन्य वाहनाची प्रतीक्षा करण्यासाठी इथे भरउन्हात उभे राहावे लागत आहे. तसेच, काम सुरु असल्याने इथे एकच मार्गिका सुरु आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत इथे प्रवाशांची गर्दी असते. औद्योगिक वसाहत असल्याने खेड व चिपळूण आगारातून दर अर्ध्या तासाने बससेवा सुरु असते. मात्र, या प्रवाशांचे उन्हात हाल होत आहेत. याठिकाणी उन्हापासून तात्पुरत्या स्वरूपात का होईना; परंतु, ठेकेदार वा बांधकाम विभागाने प्रवासी निवारा शेड उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.






