पनवेलमध्ये प्रीपेड रिक्षाची प्रतीक्षाच

| पनवेल | वार्ताहर |

रिक्षाचालकांची मनमानी संपवण्याकरता पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करता लागणारा बूथ उभा करण्यासाठी जागा स्थानक मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाणे रेल्वे प्रशासनाशी करार केला होता. मात्र, या कराराची मुदत संपल्याने तसेच, ही सेवा देण्यासाठी कोणत्याही रिक्षा संघटनेने पुढाकार न घेतल्याने प्रीपेड रिक्षाचा प्रस्ताव बारगळला असून, नव्याने करार होईपर्यत प्रीपेड रिक्षासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा पनवेलकरांना करावी लागणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांची चालणारी मनमानी आणि दादागिरी पनवेल करांसाठी नवीन नाही. रिक्षा चालकांच्या या मनमानीला चाप बसावा तसेच, रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांकडून होणार्‍या गैर प्रकाराणा आळा बसावा या हेतूने पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून प्रीपेड रिक्षा सेवा सुरु करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला होता. त्या वेळी रिक्षा चालकांच्या काही संघटनांचा देखील या निर्णयला पाठिंबा दिला होता. आरटीओच्या या निर्णयामुळे मनमाणी पद्धतीने भाडे आकारणे, प्रवाशासोबत अरेरावी करणे अशा प्रकाराणा आळा बसून रिक्षा प्रवाशांना याचा फायदा मिळणार असल्याने रेल्वे स्थानक परिसरातून लवकरात लवकर प्रीपेड रिक्षा सुरु होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य होऊ न शकल्याने त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बूथ उभरण्यासाठी लागणार्‍या जागे संदर्भात झालेला करार सपुष्टात आल्याने नव्याने करार होईपर्यत प्रीपेड रिक्षासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी निलेश धोटे यांनी दिली आहे.

प्रीपेड रिक्षा सेवेचे फायदे
प्रीपेड रिक्षा सेवा देण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात बूथ उभारण्यात येतो. या ठिकाणावरून प्रवाशांना प्रादेशिक परिवहन विभागाने आखून दिलेल्या दरा नुसार इच्छुक स्थळी जाण्यासाठी पैसे भरून कुपन उपलब्ध करून दिला जातो. रिक्षा चालकाने प्रवशाला इच्छित स्थळी सोडल्यावर संबंधित बूथमधून रिक्षा चालकाला पैसे दिले जातात.
प्रीपेड रिक्षा सेवा लांबली
रिक्षा टॅक्सी चालकांची सद्दी संपवण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड रिक्षा सेवा सुरु करण्याचा निर्णय या अगोदर घेण्यात आला आहे. प्रीपेड रिक्षा सुरु करण्यासाठी काही रिक्षा संघटनांनी देखील अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, काही महिन्यापूर्वी घोषित योजना अद्याप सुरु होऊ न शकल्याने प्रवासी आणि रिक्षा संघटना संभ्रमात आहेत.
Exit mobile version