जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत रस्त्यांमुळे रुग्णांची हेळसांड

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील अंतर्गत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असल्यामुळे अपघात विभागातून रुग्णाला हलवताना अतिशय हालअपेष्टाला सामोरे जावे लागत आहे. येथून हाकेच्या अंतरावरच असणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची अक्षम्य हेळसांड सुरु आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून गोरगरीब, आदिवासी बांधव व इतर रुग्ण उपचारासाठी येत असतात. एखादा मोठा अपघात, दुर्घटना झाल्यानंतर देखील रुग्णांना तात्काळ उपचारासाठी जिल्ह्यातून अलिबाग येथील आणले जाते. गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय म्हणजे आधार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे विभाग आवारातील इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. अपघाती विभागात अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण आल्यानंतर त्याच्यावर प्रथमोपचार करुन सर्व सोपस्कार पार पाडल्यावर पुढील उपचारासाठी अन्य विभगात दाखल केले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना स्ट्रेचर वरुन आवारातच असलेल्या इमारतीत हलविताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरुन रुग्ण येजा करताना अक्षरशः व्हिवळत असताना पहायला मिळतात. रुग्णालयाच्या इतर भागातील सर्व रस्ते सिमेंटचे करण्यात आले आहेत. मात्र ऑक्सिजन प्लांट कार्यान्वीत असताना येणार्‍या अडचणींमुळे अपघात विभाग आणि नर्सिंग इमारत तसेच ओपीडी परिसरातील रस्त्याचे काम करता आले नव्हते. मात्र आता रुग्ण कमी असल्याने ऑक्सिजन प्लांटची रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात या रस्त्याचे काम करता येणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक निधी देखील मंजूर आहे. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागा चालढकल करीत असल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. दोन महिन्यानंतर पावसाळा सुरु होईल. तत्पुर्वी जर या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले नाही. तर मात्र रुग्णांच्या हालामध्ये आणखी वाढ होतील. त्याचप्रमाणे रुग्णांचे नातेवाईक आणि उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी यांना देखील पावसाच्या पाण्यातून ये जा करण्याची वेळ येईल. त्यामुळे सदर रस्त्याचे काम त्वरीत करुन रुग्णांची हेळसांड थांबविण्याची मागणी शेकापक्ष आरोग्य सेलचे रुपेश पाटील यांनी केली आहे.

सदर रस्त्याचे काम त्वरीत होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला असून निधी देखील मंजुर करण्यात आलेला आहे. गैरसोय टाळण्यासाठी पावसाळयापूर्वी काम होणे गरजेचे आहे. – डॉ सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

रुग्णालयातच्या आवारातील रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे. मात्र उर्वरित रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना त्वरीत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. – जगदिश सुखदेवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Exit mobile version