पाली पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल
। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।
रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळी येथील कुंभारआळी येथे राहणारे कुणाल विठ्ठल पवार (42) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी येथील जानकी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गुन्हा सोमवारी (दि.7) पाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 मार्च 2026 रोजी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कुणाल पवार यांच्या हाताला मुंग्या येत असल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्या पत्नी शारदा पवार यांनी त्यांना उपचारासाठी परळी येथील जानकी हॉस्पिटलमध्ये नेले होते. हॉस्पिटलमधील डॉक्टर विशाल विलास परदेशी यांनी रुग्णाचा रक्तदाब 250 पर्यंत वाढल्याचे सांगितले. त्यानंतर नर्सने त्यांना सलाईन लावून दोन इंजेक्शन्स दिली. रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बिल भरून डिस्चार्ज घेताना कुणाल पवार यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना तात्काळ वॉर्डमध्ये नेऊन सीपीआर देण्यात आला, परंतु त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मयत रुग्णाच्या पत्नीने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत पुरवणी जबाब दिला होता. रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे असतानाही, बीएचएमएस पदवीधारक असलेल्या डॉक्टर विशाल परदेशी यांनी योग्य त्या तपासण्या न करता किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवण्याऐवजी रुग्णाला तीन तास हॉस्पिटलमध्येच ठेवले. तसेच डिस्चार्ज देताना बीपी तपासणी न करता हलगर्जीपणा दाखवला, असा आरोप तक्रारदारांनी केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाली पोलिसांनी उपचाराची कागदपत्रे आणि डॉक्टरांच्या शैक्षणिक अर्हतेची माहिती रायगड-अलिबाग येथील जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अभिप्रायासाठी पाठवली होती.
शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक 18 ऑगस्ट 2026 रोजी पार पडली. या बैठकीत सर्व वैद्यकीय कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर, मयत कुणाल पवार यांच्या उपचारादरम्यान उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा अधिकृत अभिप्राय तज्ज्ञ समिती आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी 2 सप्टेंबर 2026 रोजी दिला. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानंतर, शारदा कुणाल पवार यांच्या तक्रारीवरून सोमवारी पाली पोलीस ठाण्यात डॉक्टर विशाल परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश भागवत सांगळे करत आहेत.




