भरपावसात अत्यवस्थ रुग्णाला छत्रीचा आधार; अपघात कक्षासमोर साधी शेडही नाही
| चौल | प्रतिनिधी |
वेळ दुपारी दोन वाजताची… बाहेर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याचवेळी सायरन वाजवत एक रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाच्या अपघात कक्षाच्या दारात येऊन थांबली. डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय स्ट्रेचरसह सज्ज होते. रुग्ण अत्यवस्थ होता. त्याला आधीच ऑक्सिजन लावण्यात आला होता. मात्र, रुग्णालयाच्या दारात पोहोचल्यानंतरही त्याला सुरक्षितपणे आत नेता आले नाही. कारण, अपघात कक्षासमोर साधी शेडही नव्हती. अखेर भरपावसात छत्रीचा आधार घेत रुग्णाला बाहेर काढण्याची नामुष्की ओढवली आणि जिल्हा रुग्णालयाच्या निष्काळजी कारभाराचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले.
जिल्हा रुग्णालय सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहात आहे. कधी स्लॅब कोसळणे, कधी छताला गळती, कधी पाणीपुरवठा खंडित होणे, तर कधी एक्स-रे, सीटीस्कॅनसारखी यंत्रणा बंद पडणे अथवा ती चालविण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसणे, अशा समस्यांनी रुग्णालयाचा कारभार अक्षरशः वेढला आहे. आता त्यात आणखी एका गंभीर त्रुटीची भर पडली आहे.
शुक्रवारी (दि. 24) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अत्यवस्थ रुग्णाला घेऊन आलेली रुग्णवाहिका अपघात कक्षासमोर उभी राहिली. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने रुग्णाला रुग्णवाहिकेतून बाहेर काढताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अपघात विभागासमोर कोणतीही संरक्षक शेड नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी छत्रीचा आधार घेत रुग्णाला कसेबसे स्ट्रेचरवर हलविले. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रुग्णालयाच्या इमारतींच्या डागडुजीवर आणि नवीन बांधकामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, अत्यवस्थ रुग्णांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी अपघात कक्षासमोर साधे पत्र्याचे शेड उभारण्याचा विचारही प्रशासनाला का सुचला नाही, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन अपघात विभागासमोर कायमस्वरूपी संरक्षक शेड उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.







