शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरणार रायगडकरांसाठी वरदान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत विविध विभागांमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण विभागातील आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे डिप्लोमाबरोबरच आता पदवी शिक्षणही घेता येणार आहे. या अभ्यासक्रमांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगडकरांसाठी वरदान ठरणार आहे.
अलीकडेच शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी सर्व नियमांची पूर्तता करुन जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक मजबूत करण्याच्या हेतूने पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे केला आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कोकणातील पहिले महाविद्यालय ठरणार आहे. एक आरोग्य केंद्र म्हणून रायगड जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. संपूर्ण कोकणातील सर्वात मोठे शासकीय महाविद्यालय असून, याचा फायदा जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षाला हजारोंच्या संख्येने उपचार घेत असतात. मात्र, सुविधांअभावी त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. अपुऱ्या सुविधांचा फटका रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना कायमच बसला आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे सर्वसमावेशक अशी सेवा पुरविणे शक्य होणार आहे.
अलिबाग येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम 2021 पासून सुरु करण्यात आले आहे. या महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे कोणतेही पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नाही. या संस्थेमधील चिकित्सालयीन विभागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये रुग्णांना सेवा देणे कठीण होत आहे. त्याचा कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाविद्यालयात डीएनबी (पदवी आणि डिप्लोमा हा अभ्यासक्रम सुरु केल्यास रुग्णतपासणी आणि उपचाराचा दर्जा वाढविणे आणि आवश्यकतेनुसार उपचाराच्या सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. त्यानुसार डिप्लोमाबरोबरच पदवी शिक्षणासाठी अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे 13 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली आहे.
भविष्याच्या दृष्टीने पावले टाकत डॉ. पूर्वा पाटील यांना विविध विषयांतील 28 जागांच्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. या अभ्यासक्रमात भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, पॅथॉलॉजी, नेत्ररोग शास्त्र, सामान्य शस्त्रक्रिया, कौटुंबिक औषध, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, रेडिओनिदान आदींना प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यालयातील डॉक्टरांचा रुग्णालयाला आधार रायगड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या अलिबाग शहरात जिल्हा रुग्णालय असून, गेली अनेक वर्षे याठिकाणी रुग्णांची हेळसांड होत आहे. डॉक्टरांची कमतरता, असुविधा, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे हे रुग्णालय चर्चेचा विषय झाले आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर सेवा देणे शक्य झाले आहे. आजच्या घडीला महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका, मदतनीस अशा जवळपास 50 जणांची टीम जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना सेवा पुरवित आहे.
आरोग्य विभाग होणार बळकट अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने वेगवेगळ्या विशेष तज्ज्ञांच्या अभ्यासक्रमाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईत जाण्याच्या खर्च व वेळाची बचत होणार आहे. अलिबागमध्ये रुग्णांवर उपचार होणार असल्याने आरोग्य विभागाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.






