गृहविलगीकरणातील रुग्ण ठरताहेत कोरोनावाढीचे निमीत्त


शासनाकडेन कडक प्रतिबंधाचे संकेत
तर ग्राम सुधार समितीला गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
जिल्ह्यात तब्बल 4 हजार 864 रुग्ण गृहविलगीकरणात

। अलिबाग । भारत रांजणकर ।
डेंजर झोन मध्ये असणार्‍या रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अलिबाग तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाचा ताप वाढला आहे. या कोरोना वाढीच्या दराला गृहविलगीकरणातील रुग्णांचा बेजबाबदारपणा निमित्त ठरत असल्याचे पुढे येत आहे. त्याचप्रमाणे लक्षणे दिसत असून देखील अनेकजण त्याकडे बेफिकिरपणे पाहत असल्याने तेही धोकादायक ठरत असल्याचे अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले. गृहविलगीकरणास बंदी असतानाई जिल्ह्यात तब्बल 4 हजार 864 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर 1 हजार 451 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

रायगड जिल्ह्यात मोठया संख्येने रुग्णवाढ होत आहे. सुरुवातील पनवेल मनपा क्षेत्रात मोठया संख्येने रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पनवेल मनपा क्षेत्रातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. तर रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संख्या मात्र मोठया प्रमाणावर वाढतच आहे. शनिवारी पनवेल मनपा क्षेत्रात 95 रुग्ण आढळले तर उर्वरित ग्रामीण भागात तब्बल 528 रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांची संख्या देखील पनेवल मनपा क्षेत्रात 4 तर ग्रामीण भागात 13 रुग्ण उपचारादरम्यान दगावले गेले. सदयस्थितीत पनवेल मनपा क्षेत्रात 1 हजार 140 पॉझेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित रायगड जिल्ह्यात 5 हजार 175 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे रायगडच्या ग्रामीण भागात रुग्णवाढ आटोक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता गृहविलगीकरणात रुग्ण ठेवण्यासाठी शासनाने मनाई केली आहे. तरी देखील जिल्ह्यात एकुण 6 हजार 315 रुग्णांपैकी पनवेल मनपा क्षेत्रात 597 तर रायगड ग्रामीण मध्ये 854 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर तब्बल 4 हजार 864 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. ही संख्या फार मोठी असली तरी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय असतो. तथापि गृहविलगीकरणात असलेले बहुतांशी रुग्ण बेफिकिरपणे वावरत असतात. त्यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात रुग्ण संख्या आटोक्यात येण्याऐवजी वाढतच असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे अनेकजण हे लक्षणे जाणवत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करुन कोरोना टेस्ट न करताच घरच्या घरी उपचार घेणे पसंत करीत आहेत. त्यामुळे त्रास वाढून रुग्ण दगावण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.

या सर्वांवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक निर्बंध घालण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोना बाधीत रुग्णांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध राहील. ग्राम पंचायत स्तरावर कोव्हीड केअर सेंटर तयार करुन, यापुढे सर्व करोना बाधीत रुग्णांना सदर कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. तसेच ग्राम स्तरीय कोव्हीड केअर सेंटर मध्ये जागा उपलब्ध नसल्यास रुग्णांना तालुकास्तरीय कोव्हीड केअर सेंटर मध्ये पाठविण्यात यावे, यापुढील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना गृहविलगीकरण आवश्यक असल्यास विहित नमुन्यामध्ये हमीपत्र व घरामध्ये स्वतंत्र बेडरुम व स्वच्छतागृह असल्याबाबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर गृहविलगीकरण करता येईल. गृहविलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींनी पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर 15 दिवसाच्या आत घराबाहेर पडू नये. असे रुग्ण विलिगीकरण कालावधीमध्ये घराबाहेर पडत असल्यास ग्रामपंचायतीने सदर व्यक्तीविरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version