| अलिबाग | संतोष राऊळ |
मी देशाभरात कानाकोपऱ्यात फिरते तेव्हा तेथील आणि आपल्या रायगडच्या शिक्षणात मोठी तफावत पाहते. त्यामुळे जे काम अलिबागसह रायगडमध्ये झाले ते काम कोकणात इतर ठिकाणी एवढ्या प्रमाणात झालेले दिसत नाही आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात स्व. प्रभाकर पाटील यांच्यासह संपुर्ण पाटील कुटुंबियांनी काम केलेले आहे, ते वाखाण्याजोगे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्त निवेदिका, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीची डेप्युटी एडिटर डॉ. कविता राणे यांनी केले आहे.

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे रविवारी (दि.14) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्त निवेदिका, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीची डेप्युटी एडिटर डॉ. कविता राणे आदी मान्यवरांसह संस्थेचे प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, कॉलेज प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, मुख्याध्यापक निलेश मगर, प्रशासन अधिकारी हिरेन राठोड, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, ॲकॅडमिक डायरेक्टर राजश्री पाटील, लेखापाल मनिषा रेलकर, अंकित भानुशाली इतर प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कविता राणे पुढे म्हणाल्या की, मी जेव्हा आवासमधील शाळेत शिक्षण घेत होते तेव्हा धोकवडे येथे पंत पाडाव्यानिमित्त शेकापतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जायचे. त्यावेळी वक्तृत्व स्पर्धेत व वेगवेगळ्या स्पर्धेत क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जायचे. मात्र, फक्त बक्षिस मिळायचे म्हणून हा कार्यक्रम आमच्या लक्षात राहिला नाही. त्यावेळी स्व. प्रभाकर पाटील हे आम्हाला सभागृहात बोलवायचे. त्यानंतर कोणाकोणाचा भाषणात नंबर आला आहे, त्यांना पुढे बोलवायचे आणि ते भाषण आम्हाला बोलायला सांगायचे. त्यावेळी ते प्रत्येकाच भाषण कान देऊन ऐकायचे. एखाद्याचे भाषण व्यवस्थित झाले की ते खिशातून शंभर रुपयाची नोट काढून द्यायचे. तिच आमच्या भाषणाची पोच पावती असायची. कोणी मोठी व्यक्ती आमचे भाषण ऐकते आणि आमचा सन्मान करते याचे कौतुक असायचे. मुलांना सन्मानित केल्यावर त्यांच्यात जी भावना, उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली जाते त्याची काय गरज असते, हे स्व. प्रभाकर पाटील यांना त्यावेळी कळाले होते. त्याची अनुभूती आज या गुणगौरवच्या व्यासपिठावर आल्यावर झाली.
मी देशातील कानाकोपऱ्यात फिरताना तेथील आणि आपल्या शिक्षणात मोठी तफावत पाहते. त्यामुळे जे काम अलिबागसह रायगडमध्ये झाले ते काम कोकणात तळागाळात इतक्या प्रमाणात झालेले नाही. त्यामुळे रायगडच्या शिक्षण क्षेत्रात स्व. प्रभाकर पाटील यांच्यासह संपुर्ण पाटील कुटुंबियांनी काम केलेले आहे ते वाखाण्याजोगे आहे, असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्त निवेदिका, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीची डेप्युटी एडिटर डॉ. कविता राणे म्हणाल्या.
या गुणगौरव कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, स्व. प्रभाकर पाटील यांचे नाव शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांना खऱ्या अर्थाने उच्च शिक्षण देण्यासाठी आमचे नेते संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पीएनपी एज्युकेशन सोसायटी संस्था सुरू केली. सध्या पीएनपी एज्युकेशन संस्था ही प्रगती पथावर आहे. दरवर्षी संस्थेत सुधारणा होत आहे. दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात प्रभाविष्कार नावाने केला जातो. त्यापैकी हा गुणगौरव हा पहिला कार्यक्रम असतो. यापुढे, आहे ते टिकवणं आणि प्रत्येक दहा गावांना एक आधुनिक पद्धतीची सीबीएसई शाळा देणे हे मुख्य ध्येय आहे. आज संस्थेच्या जिल्हाभर कानाकोपऱ्यात मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. या संस्थेची सुरूवात पडक्या इमारतीपासून झाली आहे. त्यावेळी कमी विद्यार्थी होते आणि आता पीएनपी संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच, पीएनपी संस्थेतील शाळा व महाविद्यालयचा निकालही शंभर टक्के लागतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच संस्थेच्या प्रगतीमध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार चित्रलेखा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत वार्डे यांनी केले. तर, आभार प्रा. दिनेश पाटील यांनी मानले.
विद्यार्थ्यांसह अनेकांचा गुणगौरव
यावेळी विद्यार्थ्यांसह अनेकांचा गुणगौरव करण्यात आला. त्यात शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा, संस्थेत पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, 80 टक्क्यांच्या वर गुण प्राप्त केलेले विद्यार्थी, विषयानुसार संस्थेत प्रथम क्रमांक मिळविले विद्यार्थी, शाळांतील, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा चित्रलेखा पाटील व डॉ. कविता राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.







