पटना पायरेट्सचा तब्बल 22 गुणांनी दणदणीत विजय

| अहमदाबाद | वृत्तसंस्था |

अहमदाबाद येथे प्रो कबड्डी 10 लीगमधील आठवा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाने टायटन्सला 50-28ने पराभूत केले. तसेच, शानदार विजयासह स्पर्धेची जबरदस्त सुरुवात केली. या सामन्यात तेलुगू टायटन्स संघाचा कर्णधार पवन सेहरावत याने पीकेएल स्पर्धेतील 1000 चढाई गुण मिळवण्याचा जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, त्याची ही ऐतिहासिक कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील आठव्या सामन्यात पटना पायरेट्स संघाच्या सचिनने सर्वाधिक 14 चढाई गुण मिळवले. तसेच, बचाव फळीमध्ये अष्टपैलू अंकितने शानदार प्रदर्शन करत 5 टॅकल गुण नावावर केले. तेलुगू टायटन्स संघाचा कर्णधार पवन सेहरावत याने सामन्यात 11 गुण मिळवले, पण त्याच्या सलग दुसऱ्या सुपर 10 नंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. खेळाच्या पूर्वार्धात पवनने पहिल्या 2 यशस्वी चढाया केल्या. त्यानंतर उत्कृस्ट चढाई करत त्याने पीकेएल स्पर्धेतील आपले 1000 चढाई गुण अशी कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू बनला. मात्र, सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर पटनाने सामन्यात शानदार पुनरागमन करत पहिल्या ब्रेकनंतर 13व्या मिनिटाला तेलुगू संघाला सर्वबाद करत आघाडी घेतली. यानंतर पहिल्या पूर्वार्धात संपण्यापूर्वी त्यांनी 19व्या मिनिटाला पुन्हा एकदा पटना संघाने तुेलुगू संघाला सर्वबाद केले आणि तेव्हा त्यांची आघाडी एकतर्फी झाली होती.सुरुवातीला पटना संघ सामन्यात 28-16ने आघाडीवर होता. सचिनने उत्कृष्ट चढाई करून सर्वाधिक 9 गुण घेतले होते.बचाव फळीमध्ये पटनाकडून अंकितने शानदार प्रदर्शन करत सुरुवातीलाच3 टॅकल गुण मिळवले. तेलुगू टायटन्सकडून पवनने सर्वाधिक 7 चढाई गुण घेतले. मात्र, त्याच्या 5 अयशस्वी चढाईमुळे संघाला नुकसान झाले.

सामन्याचा उत्तरार्ध सुरू झाल्यानंतर लगेच सचिनने आपला सुपर 10 पूर्ण केला, पण पुढच्याच चढाईमध्ये तो बाहेरही गेला. मात्र, पटना पायरेट्सने आपली आघाडी मजबूत केली आणि 30व्या मिनिटाला त्यांची आघाडी वाढून 36-25 झाली होती. सामन्यातील 34व्या मिनिटाला तेलुगू टायटन्स संघ सामन्यात तिसऱ्यांदा सर्वबाद झाला आणि इथून 42-27च्या गुणांसह पटना पायरेटन्सने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने केला. यानंतर तेलुगू टायटन्स संघ फक्त एक गुण घेऊ शकला आणि पटनाने अंतिम क्षणात आपले गुण 50 पर्यंत पोहोचवले. अशाप्रकारे हा सामना पटनाने 50-28च्या मोठ्या फरकाने खिशात घातला.

Exit mobile version