। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहन चालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई केली. एक लाख 8 हजार 83 वाहनांवर ई-चलनाद्वारे जानेवारी ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आठ कोटी 77 लाख सात हजार असून 18 कोटी रुपयांचा दंड थकीत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अवजड वाहनांची खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. वर्षाला सुमारे वीस हजार पेक्षा अधिक दुचाकींची खरेदी होत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली आहे.
वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने ऑनलाईन पध्दतीने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. पॉझ मशीनद्वारे एका क्लीकवर दुचाकीचे छायाचित्र काढून त्या चालकाला दंडात्मक कारवाई झाल्याचा मेसेज पाठविला जात आहे. त्यानुसार त्याने कार्यालयात येऊन अथवा ऑनलाईन पध्दतीने दंड भरण्याची सोय केली आहे. काही वाहन चालक दंड भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यात वर्षभरात एक लाख 23 हजार 673 वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यापैकी 15 हजार 590 चालकांकडून एक कोटी 16 लाख 70 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र एक लाख आठ हजार 83 चालकांकडून आठ कोटी 77 लाख 7 हजार 650 रुपयांचा दंड थकीत आहे. चालकांनी तातडीने दंड भरावा असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लांडे यांनी केले आहे.
लोक अदालतीमध्ये दंड भरा
ई चलनाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईतून अनेक वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला लोक अदालत आहे. या अदालतमध्ये नागरिकांनी येऊन थकीत दंड भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.