दोन लहान गाड्या नेरळ ग्रामपंचायतीच्या ताफ्यात
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायत शहरीकरणाकडे झुकली असून नागरीकरण झालेल्या सर्व भागातील कचरा उचलता यावा यासाठी दोन नवीन घंटागाडी उपलब्ध झाल्या आहेत. नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व गल्लीबोळात घंटागाडी पोहचत नाही. त्यामुळे त्या अरुंद भागातील कचरा उचलता यावा यासाठी स्वच्छ भारत अभियानमधून लहान टेम्पो आणण्यात आले आहेत. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीसाठी स्वच्छ भारत अभियानमधून मिळालेल्या घंटागाड्या या इलेक्ट्रिक गाड्या आहेत. त्यामुळे इंधनावरील खर्चदेखील बचत होणार आहे.
नेरळ गावातील प्रत्येक भागात कचरा उचलणे नेरळ ग्रामपंचायत आरोग्य आणि स्वच्छता विभागाला शक्य होत नाही. त्यात गावातील अनेक भाग हे गल्लीबोळासारखे आहेत. हि बाब लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांनी स्वच्छ भारत अभियान कडे अतिरिक्त घंटागाडी देण्यसासाठी प्रस्ताव सादर केले. स्वच्छ भारत मिशनमधून नेरळ ग्रामपंचायतीसाठी दोन इलेक्ट्रिक लहान टेम्पो कचरा उचलण्यासाठी मंजूर करून दिले.
नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांच्या संकल्पनेतून दिवाळीपासून रात्रीच बाजारपेठ भागातील कचरा उचलून घेण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेमुळे नेरळ गावातील व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण असून आरोग्य विभागाकडून त्या संकल्पनेची अंमलबजावणी होते कि नाही याकडे नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अरुण कारले यांच्याकडून बारीक लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे.