एसटी डेपोत-बाजारपेठेत शुकशुकाट

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलचे तापमान 34 अंशांपर्यंत वाढलेला असताना तप्त उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दिवसा बाजारपेठेवरही उन्हाच्या झळांचा परिणाम बघायला मिळतो आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत एसटी आगारात शुकशुकाट पाहायला मिळतो आहे.

यंदाचा उन्हाळा कडक असल्याने मार्चपासूनच झळा सोसाव्या लागत आहेत. अशात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत होती. सध्या उन्हाचा वाढता तडाखा व महिनाअखेरामुळे बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून होळी, रमजान ईद, यांसारख्या सणांचे औचित्य साधत खरेदीचा धडाका सुरू आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने त्याच्याशी निगडित व्यवसायिकांकडे गर्दी होत आहे. मात्र, अनेक ग्राहक दुपारी खरेदी करणे टाळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दिवसा असलेल्या तुरळक ग्राहक वर्गाकडून उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ, उपरणे अशा वस्तूंचा आधार घेतला जात आहे. काही बाजारपेठांमध्ये ग्राहकांना उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी ग्रीन नेट लावण्यात आलेली असून, त्याचा काही प्रमाणात फायदा होताना दिसत आहे.

Exit mobile version