पाचही मापदंडांवर उल्लेखनीय कामगिरी; स्वदेस फाऊंडेशनतर्फे गावांचा स्नमान
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील पेडांबे या गावाने स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर व समृद्ध अशा पाचही मापदंडांवर उल्लेखनीय कामगिरी करत आराखड्यातील 87 टक्के कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे या गावाचा स्वदेस फाऊंडेशन तर्फे ‘स्वप्नातील गाव’ म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
स्वदेस फाऊंडेशन तर्फे स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर व समृद्ध अशा पाचही मापदंडांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावाला ‘स्वप्नातील गाव’ म्हणून सन्मानित करते. याच पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील पेडांबे गावातील नागरिक, तरूण आणि मुंबईत राहत असलेले पेडांबेकर यांनी उत्तुंग एकजूट दाखवत गावाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन एकत्रितपणे केले होते. यादरम्यान, चित्रे व सुविचारांनी सजलेल्या गावातील भिंती, आकर्षक रांगोळ्या आणि शुशोभिकरण यामुळे गावाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. या उपक्रमांमुळे पेडांबे गावाने स्वप्नातील गाव प्रकल्पात आपले वेगळे स्थान निर्माण केले. पेडांबेकरांनी स्वदेस फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता उपक्रम, आरोग्य जनजागृती, रस्ते-सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, तरुणांचे कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे स्वदेश फाऊंडेशन तर्फे पेडांबे गावाला ‘स्वप्नातील गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. गट विकास अधिकारी माधव जाधव यांनी गावाचे अभिनंदन व कौतुक केले.तसेच, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी तंटामुक्त पेडांबे गावाचे अभिनंदन करून सायबर गुन्हे यावर मार्गदर्शन केले. या सर्वांगीण विकासामुळे पेडांबे गावाने स्वप्नातील गाव करण्यात अभिमानाची मान उंचावली आहे.
दरम्यान, समारंभाच्या दिवशी लेझीम व खालू वादकांच्या तालावर निघालेल्या भव्य मिरवणुकीने गाव दुमदुमून गेले होते. यावेळी असणारा महिलांचा सहभाग, तरुणांचे योगदान आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नांनी पेडांबेने विकासाचा नवा आदर्श ठेवला आहे. या कार्यक्रमावेळी म्हसळा गट विकास अधिकारी माधव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, स्वदेस फाऊंडेशन व्यवस्थापक शिवतेज ढउळ, नजीर शिकलगार, विशाल वरुटे, सरपंच जयदास भायदे, उपसरपंच हरिश्चंद्र जंगम, चांगदेव सानप, अजित कांगणे, नरेंद्र काजारे, सागर जाधव, स्वराली जाधव, विजया जाधव,सविता पाटील, भिकू पाटील, मच्छिन्द्रनाथ महाडिक, धोंडू दाभेकर, प्रभाकर पाटील, अशोक अधिकारी तसेच गाव विकास समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
