पेडीग्री श्‍वान ठरताहेत स्टेटस सिंबॉल

नोंदणी केलेल्या श्‍वानांना मिळतेय पसंती

। रायगड । आविष्कार देसाई ।

सध्या विविध ब्रीडचे श्‍वान, मांजर पाळण्याचा ट्रेंड चांगलाच फोफावत असून, ते एक आता स्टेटस सिंबॉल बनले आहे. पेडीग्री (जातीवंत) श्‍वान अथवा मांजरांच्या किमती या किमान दहा हजारांपासून दोन लाखांचा पुढे असतात. सध्या बाजारात असे पाळीव प्राणी हे जातीवंत असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. रायगड जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश पाळीव प्राण्यांची नोंद केनेल क्लब ऑफ इंडियाकडे नसल्याचे चित्र आहे. आता ट्रेंड बदलला असून, जातीवंत श्‍वान, मांजर पाळण्यात येत आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याचे चोचलेदेखील वेगळेच असतात. त्यांच्या खाण्या-पिण्यासाठी लागणार्‍या पदार्थांची दुकाने जागोजागी उघडली गेली आहेत. त्यांच्यासाठी विशिष्ट दवाखानेदेखील सुरु झाले आहेत.जातीवंत श्‍वान विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी मालकांची आहे. तसेच त्याला उच्च प्रतीचा आहारही दिला जातो. त्याची औषधे, कपडे अशा विविध कारणांसाठीही हजारो रुपये खर्च येतो.

केनेल क्लबची स्थापना 4 एप्रिल 1873 रोजी करण्यात आली. रॉयल केनेल क्लब हा युनायटेड किंगडमचा अधिकृत केनेल क्लब आहे. हा जगातील सर्वात जुना मान्यताप्राप्त केनेल क्लब आहे. श्‍वानांचे शो, त्यांची चपळता आणि कार्यरत चाचण्यांसह विविध श्‍वानांच्या क्रियाकलापांवर देखरेख करणे ही त्याची भूमिका आहे. हे युनायटेड किंगडममधील वंशावळ कुत्र्यांचे राष्ट्रीय रजिस्टरदेखील चालवते आणि यूकेमधील श्‍वानांशी संबंधित समस्यांवर लॉबी गट म्हणून काम करते. त्याचे मुख्यालय मेफेअर, लंडन येथील क्लार्जेस स्ट्रीटवर असून, आयलेसबरी येथे व्यवसाय कार्यालय आहे. 5 एप्रिल 2024 रोजी त्याचा 151 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. देशातील नागरिकांच्या सोयीसाठी दिल्लीमध्येदेखील एक कार्यालय आहे. रॉयल केनेल क्लबने श्‍वानांच्या 222 जाती ओळखल्या आहेत. या ठिकाणी संबंधित श्‍नानाची वंशावळ येथे सापडते. त्यामुळे तो श्‍वान जातीवंत असल्याचे खात्रीलायक असल्याचे बोलले जाते. याच कारणाने अशा श्‍वानांची किंमत लाखो रुपयांत आहे. मात्र, केनेल क्लबकडे रजिस्ट्रेशन नसल्याने कदाचित तुमची फसवणूकदेखील होऊ शकते.

मला पाळीव प्राण्यांची फार आवड आहे. माझ्याकडे पग जातीचे फिमेल श्‍वान आहे, तसेच इटालीयन मांजरदेखील आहे. दोन्ही पाळीव प्राणी जातीवंत आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याचा थाट ठेवावा लागतो. लहान मुलांप्रमाणे आम्ही त्यांचे लाड करतो. तेदेखील आम्हाला जीव लावतात.

रमेश टोळकर,
माणगाव
श्‍वानांच्या विविध जाती
जगभरात श्‍वानांच्या विविध जाती आढळतात त्यामध्ये बॉक्सर, गोल्डन रिट्रीवर, लैब्राडोर, कॉकर स्पॅनियल, बीगल, डॉबरमॅन, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, अल्सॅटियन, हस्की अशा विविध श्‍वानांच्या जाती आहेत. त्यांना अधिक पसंती दिली जाते.
मांजरांच्या जाती
प्राचीन इजिप्शियन लोक मांजराची पूजा करायचे, असे बोलले जाते. मांजरांच्या विविध जातींमध्ये रॅगडॉल, मेन कून, ब्रिटिश शॉर्टहेअर, स्कॉटिश फोल्ड, स्फिंक्स, सियामीज, पर्शियन, बंगाल, बर्मीज, रशियन निळा यांचा समावेश होता.
Exit mobile version