। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील जोहे गावांमधील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात वरेडी येथील एका विवाहित महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची घटना घडली होती. सदर महिलेची तब्येत गंभीर झाल्याने तिला अधिक उपचारार्थ जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने हमरापूर विभागातील ग्रामस्थांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी डॉ. धुमाळसह इतर आरोपींची कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणारी महिला गर्भवती राहिली होती. तिचा गर्भ 16 आठवड्यांचा झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात उपचारार्थ नेले. यावेळी गर्भवती महिलेची इच्छा नसताना देखील महिलेचा सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून गर्भपात करण्यात आला. डॉ. शेखर धुमाळ यांनी त्यांच्या दवाखान्यात गर्भपात केला. त्यामुळे पीडित महिलेच्या शरीरावर विपरीत परिणाम होवुन शरीरांतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने तिला तातडीने जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मुलीचा, तिच्या निष्पाप बालकाचा खून करणार्यांवर गुन्हा दाखल करा- पिडितेच्या वडिलांचा आक्रोशमाझ्या मुलीचा व तिच्या निष्पाप बालकाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. माझ्या मुलीच्या सासरवाडीच्या मंडळींनी व डॉ. शेखर धुमाळ यांनी संगनमत करून त्रमुलीची व निष्पाप बालकाची हत्या केली आहे. त्यांच्यावर कलम 302 नुसार दोन जणांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पिडित महिलेचे वडील चंदर शंकर कोळी यांनी केली आहे.
डॉ. धुमाळच्या वैद्यकीय पदवीची तपासणी करा- प्रवीणा सावंतदोन निष्पाप जीवांची हत्या करणार्या डॉ. शेखर धुमाळ व त्याच्या सहकार्यांना जन्मठेप द्या. तसेच डॉ. शेखर धुमाळच्या वैद्यकीय पदवीची तपासणी करा. आरोग्य विभागाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या व सामाजिक कार्यकर्त्या प्रवीणा सावंत यांनी केली आहे.