कंपनी बसेस व व्यापार्यांच्या गाड्यांचा नागरिकांना त्रास
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहराचा विचार करता नागरीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत चालत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या सकाळ, दुपार, संध्याकाळ पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांसोबत विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पेण शहरात धरमतर रोड हा पूर्ण गजबजलेला असतो. त्यातच पथारीवाल्यांनी रस्त्यांची दोन्ही बाजू काबीज केल्याने ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच चालणे कठीण होऊन बसले आहे.
पेण शहर हे नियोजित शहर नसून, ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे पेण शहराचे रस्ते अरूंद आहेत. त्यातच वाहतुकीचे सर्व नियम कंपनी बसेसने आणि व्यापारीवर्गाकडून मोडण्यात येत असल्याने सर्वसामान्य पेणकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पेण शहरातील धरमतर रोडवर जुना पेट्रोल पंप ते आरटीओ कार्यालयापर्यंत कंपनीच्या बस कुठे थांबवतात. या बसचालकांना फूस मिळते ती त्या गाडीमध्ये प्रवास करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांची. कंपनीचे कर्मचारीदेखील नागरिकांशी हुज्जत घालत असतात. या सर्व प्रकारात वाहतूक कोंडी अशाप्रकारे होते की, शेवटी वाहतूक पोलिसांना यावे लागते.
वाहतूक पोलीसदेखील कंपनी बसेसच्या चालकाला बोलण्यापेक्षा नागरिकांवरच डाफरताना दिसतात. महावीर मार्ग, पेण आरडीसी बँकेजवळ सर्वात मोठी वाहतूक कोंडी होते. पेण शहरात व्यापारांचा माल उतरवण्यासाठी पेण पोलीस ठाण्याकडून व उपप्रादेशिक कार्यालय पेण व नगरपालिकेकडून काही नियम घालून दिलेले आहेत. मात्र, व्यापार्यांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाहीत.
धरमतर रोड, महावीर मार्ग, मिर्ची गल्ली, अंतोरा रोड यावरील वाहतूक कोंडी ही खर्या अर्थाने पेणकरांची डोकेदुखी आहे. या मार्गावरून पुढे ट्री हाऊस, कारमेल, पेण प्रायव्हेट हायस्कूल, सुबोध शाळा, आनंद शाळा, मदर टेरेसा, कोनायन्सस आदी शाळा आहेत. तसेच, सर्व सरकारी कार्यालये आहेत. पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, वनखाते, स्ट्रेझरी त्यामुळे मोठया प्रमाणात या मार्गांवर वर्दळ असते. त्यामुळे व्यापार्यांच्या गाडया उभ्या राहिल्याने दुचाकी वाहन जाणेदेखील कठीण होते. वेळेस नगरपालिका प्रशासनाने यात हस्तक्षेप करून जे नियम पहिल्यापासून सुरू आहेत त्या नियमांची पुन्हा नव्याने सुरूवात करावी. जेणेकरून पायी चालणार्यांना त्रास होणार नाही.
याविषयी वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांकडून नगरपालिका, पोलीस यंत्रण, आरटीओ कार्यालय यांच्या बरोबर पत्रव्यवहार देखील झालेला आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग पेणकरांना होत नाही.
चालकांची अरेरावी चालक आपल्या बसेस कोठेही थांबवत असतात. त्यांच्यावर कुणाचीच लगाम नाही. नागरिक काय बोलले तर त्यांच्याशी हुज्जत घालून अरेरावीची भाषा करतात. वेळेप्रसंगी गाडी थांबवून नागरिकांच्या अंगावर धावूनदेखील जातात.