दोन भव्य स्मारकांसह सुसज्ज चारमजली भवनाचे काम अंतिम टप्प्यात
| पेण | प्रतिनिधी |
‘ग्रोथ सेंटर’च्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईचे केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या पेण शहराचा चेहरामोहरा आता बदलू लागला आहे. शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारी दोन भव्य स्मारके, तसेच एक सुसज्ज चारमजली भवन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे प्रकल्प नागरिकांसाठी खुले होणार आहेत. पेण नगरपरिषदेच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. या माध्यमातून शहराला सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या नवी ओळख मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा 20 फुट उंच अश्वारूढ पुतळा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत आहे. या भव्य स्मारकामुळे शहराच्या प्रवेशाला ऐतिहासिक आणि अभिमानास्पद स्वरूप प्राप्त होणार आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह एक चारमजली सुसज्ज भवन उभारण्यात येत आहे. या भवनामध्ये विविध उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 16 फूट उंच पुतळा आणि त्यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणारी माहिती मांडली जाणार आहे. दुसऱ्या मजल्यावर वैचारिक देवाणघेवाणीसाठी प्रशस्त सभागृह असेल. तिसऱ्या मजल्यावर समृद्ध ग्रंथालय उभारण्यात येणार असून, चौथ्या मजल्यावर ‘विपश्यना’ ध्यानधारणा केंद्राची सुविधा उपलब्ध असेल. संपूर्ण इमारत वातानुकूलित असणार आहे.






