पेण पालिकेची ‘अशी ही बनवाबनवी’

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरातील विकासकामांच्या मुद्यावरुन पालिका प्रशासनच आता जनतेशी बनवाबनवी करु लागल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्याने हम करे सो कायदा अशी वृत्ती बळावली असल्याचे जाणवत आहे. नगरपालिका आणि कागदपत्रांची बनवाबनवी हा प्रकार सतत होत असल्याने आत्ता मुख्याधिकारी जीवन पाटील यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात पाहत आहेत.

मागच्याच महिन्यात माहितीच्या अधिकाराखाली चिंचपाडयातील अरक्षणाबाबत माहिती मागितली होती. त्यावेळेला बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांनी चुकीची माहिती दिली होती. आता देखील पेण मधील एका सामाजिक कार्यकर्त्यानी पेण नगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राबाबत माहिती मागितली होती की, पेण नगरपालिका जो पाणी पुरवठा करत आहे तो गाळमिश्रीत का येत आहे? त्यावेळी जे उत्तर दिल आहे, त्यावरुन हे सिध्द होत आहे की, पेण नगरपालिकेचे अधिकारी वर्ग बनवाबनवी करीत आहेत. उत्तरामध्ये म्हटले आहे की, पेण नगरपरिषदेचे कार्यरत दोन जलशुध्दीकरण केंद्र असून ते वीस वर्षापूर्वीचे आहेत.

पेणकरांना आठवत असेल की, पेणमध्ये 2017 ला तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मोठयाप्रमाणात बॅनरबाजी करुन दिलेला शब्द पूर्ण केला. अशाप्रकारचे होल्डींग शहरभर लावण्यात आले होते. कोट्यवधी रुपये खर्च करुन 15 ऑगस्ट 2017 ला जलशुध्दीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा करण्यात आला होता. मग अधिकारी वर्ग बेछुुटपणे खोटी माहिती कशी काय देऊ शकतात? अशी विचारणा पेणकरांनी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे, आपली कर्तव्यदक्षता लपविण्यासाठी अधिकारी वर्ग चुकीची माहिती देऊन पेणकरांना फसवत आहेत. हे सिध्द होत आहे. परंतु, पेणकर सुज्ञ आहेत, अधिकारी वर्गाच्या बनवाबनावीला बळी पडणार नाहीत. असेही नागरिकांनी प्रशासनाला सुचित केले आहे.

Exit mobile version