पेण नगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार; विद्यार्थ्यांना फटका

| पेण | प्रतिनिधी |

पेण नगरपालिकेत गेली चार वर्षे प्रशासक असल्याने अधिकारीवर्ग बेजबाबदार झाले आहेत. पेण एज्युकेशन सोसायटीच्या पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर अडीच ते तीन फूट पाणी साचले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

नगरपालिकेने नुकताच वरच्या मैदानाला भराव टाकून सिमेंटने बांधकाम केले आहे. मात्र, हे करत असताना बांधकाम अभियंत्यांना हे का सुचले नाही की, पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर खड्डा आहे. या खड्ड्यात पाणी साचू शकेल. त्यामुळे गटार व्यवस्था करणे गरजेचे आहे. पहिल्या पावसातच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचले होते. त्यावेळेला पेण एज्युकेशन सोसायटी व प्रसार माध्यमांनी नगरपालिकेला सूचित केले होते की, गटार व्यवस्था तातडीने करा अन्यथा शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचे हाल होतील. परंतु, पेण नगरपालिकेने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. शाळा सुरू होऊन दोन दिवसच उलटले आहेत. आज पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा प्रवेशद्वारावर पाणी साचले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पेण नगरपालिकेने ब्रेकर लावला. परंतु ज्या ठिकाणाहून गटार व्यवस्था करता येईल, त्या ठिकाणी एक अनधिकृत टपरी आहे आणि त्या टपरीला पेण नगरपालिका एक प्रकारे अभय देत आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे ब्रेकरने काम करणे शक्य नाही. अनधिकृत टपरीधारकाला महावितरण कंपनीनेसुद्धा दहा हजार रूपये घेऊन वीज कनेक्शन दिल्याची चर्चा आहे. एकीकडे सर्वसामान्यांना वीज कनेक्शन घ्यायला हेलपाटे घालावे लागतात. परंतु, अवैधरित्या लक्ष्मीदर्शन दिल्यावर सहज काही बाबी शक्य होतात. याच हे जिवंत उदाहरण आहे, असे बोलले जात आहे.

ज्या वेळेला मैदानाचे काम केले, त्यावेळेला बांधकाम अभियंत्यांनी केलेल्या चुकीमुळे आता गटार व्यवस्था केल्यास एक ते दीड वर्षांपूर्वी लावलेले पाम वृक्ष काढावे लागतील. तसेच काही पाम वृक्ष आता जात असणाऱ्या पाण्यामुळे कोलमडून पडलेले आहेत. तर, येत्या दोन दिवसात पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रवेशद्वारावरची ही समस्या सुटली नाही, तर पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळ व पालकवर्ग नगरपालिकेवर धडकतील, असे पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

Exit mobile version