पेण पं.स. कार्यालय बीडीओविनाच; कर्मचार्‍यांचा अनागोंदी कारभार


। पेण । प्रतिनिधी ।
तहसील कार्यालयानंतर तालुक्याचा महत्वाचा प्रशासकीय कार्यालय म्हणून पंचायत समिती कार्यालयाकडे पाहिले जाते. परंतु, गेली एक ते दीड वर्ष पेण पंचायत समिती कार्यालयाला पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसल्याने या कार्यालयातील कर्मचारी मनमानेल तसा कारभार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बीडीाआच नसल्याने त्यांना वरिष्ठांची भीतीच उरली नाही. शासन नियमानुसार पाच दिवसाचा आठवडा झाल्याने कार्यालयीन कामाच्या वेळा वाढल्या आहेत. परंतु, याचे अजिबात भान पेण पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांना नाही. मात्र, रविवार सोबत शनिवारची सुट्टी देखील कर्मचारी हक्काने घेतात. सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयीन कामकाजाला सुरुवात होते. याचाच विसर कर्मचार्‍यांना पडतो. प्रस्तुत प्रतिनिधीने बुधवारी ( 20 जुलै) 10 वाजून 10 मिनिटांनी पेण पंचयात समिती कार्यालयाला भेट दिली असता, शिक्षण विभागाची खोली बंद स्थितीत आढळली. बांधकाम विभागामध्ये सर्व टेबल रिकामे, गटविकास अधिकार्‍यांची रुम रिकामी, कृषी विभागाची रुम पुर्ण खाली, प्रशासकीय विभागामध्ये एक महिला शिपाई आणि प्रशासकीय अधिकारी सुनील गायकवाड हे हजर होते. तर अर्थ विभागामध्ये कांबळे व पवार नामक लिपीक हजर होते. आरोग्य विभागात अंधारच अंधार होता.

ग्रामपंचायत विभागामध्ये एक पुरुष शिपाई वगळता पूर्ण विभाग रिकामा. ही, सर्व स्थिती प्रतिनिधीच्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्यानंतर त्यांनी भ्रमंती ध्वनीवरुन गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांना संपर्क केला, पेण पंचायत समिती कार्यालयामध्ये बोटावर मोजण्याएवढे पाच कर्मचारी 10 वाजून 10 मिनिटांनी कार्यालयात हजर होते. बाकी कर्मचारी साडे अकरापर्यंत येत होते. याचाच अर्थ कर्मचार्‍यांना वरिष्ठांचा धाक उरलाच नाही, असेच म्हणावे लागेल.

माझ्याकडे पेण पंचायत समितीची अतिरिक्त जबाबदारी असून मी आठवडयातून तीन दिवस पेण कार्यालयात असतो. कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी सुनील गायकवाड यांनी उशीरा येणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना लेटमार्क शेरा मारुन कारणे दाखवा नोटीस द्यावी. आणि ज्यावेळेला मी कार्यालयात येईन त्यावेळेला मी स्वतः कर्मचारी का उशीरा येतात, याची चौकशी करुन उशीरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल.

– भाऊसाहेब पोळ, प्रभारी बीडीओ


Exit mobile version