आरोपीला फाशी की जन्मठेप आज फैसला
| रायगड | खास प्रतिनिधी |
पेण शहरातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना 20 डिसेंबर 2020 रोजी घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात तीन वर्षापासून खटला सुरू आहे. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या खटल्यातील आरोपी आदेश पाटीलला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सोमवारी 18 डिसेंबर रोजी जन्मठेप की फाशी याचा फैसला होणार आहे. या निकालाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
तीन वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्येमुळे राज्यात संतापाची लाट उसळली हाती. जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली होती. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती राज्य शासनाने केली.
जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांच्या न्यायलायात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. गुरुवारी 14 डिसेंबर रोजी खटल्याच्या सुनावणीसाठी उज्वल निकम हे उपस्थित होते.







