पेण आरटीओला भ्रष्टाचाराचा विळखा

| पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयानंतर बेजबाबदार आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले कार्यालय म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण (आर.टी.ओ.). या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामासाठी येणार्‍या सर्वसामान्य जनतेची लूट केली जाते. कारण, येणारे अधिकारीदेखील दलालांच्या म्हणण्यानुसार चालतात, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. रसिक कोठेकर यांनी केला आहे. नवीन येणार्‍या अधिकार्‍यांकडून सर्वसामान्य जनतेला अपेक्षा असतात, की कार्यालयातील काम चिरीमिरीविना चालेल; परंतु अस होत नाही. हे रायगडकरांचे दुर्दैव आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर महेश डी. देवकांत, तर माधवराव रामराव सूर्यवंशी हे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू होत आहेत. हे दोन्ही अधिकारी स्वतःचे रंग दाखवतील (शिस्त) की दलालांच्या रंगात रंगून जातील, हे पाहण्याची उत्सुकता पेणसह रायगडकरांना लागलेली आहे. पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे येणार्‍या अधिकारी वर्गाचे लक्ष्मीदर्शन हमखास. या कार्यालयातील प्रत्येक खुर्चीवर लक्ष्मीदर्शन घडवून द्यावा लागतो; अन्यथा फाईल पुढे सरकली जात नाही. हा आजवरचा अनुभव सर्वसामान्यांना आहे, असेही अ‍ॅड. कोठेकर यांनी सांगितले. मात्र, नव्याने आलेल्या अधिकार्‍यांचा वचक भविष्यात कसा राहील, हे पाहणे औत्सुक्याचा मुद्दा ठरेल, यात काही शंकाच नाही. पोलादपूर, श्रीवर्धन या रायगडच्या कानाकोपर्‍यातून आपली कामे व्हावीत म्हणून पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्वसामान्य नागरिक येत असतात. परंतु, अधिकारी आणि दलालांच्या संगनमतामुळे सर्वसामान्यांना खूप त्रास होतो. तरी नव्याने येणार्‍या अधिकार्‍यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्यांची होणारी लूट थांबवावी, हीच माफक अपेक्षा; अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल. – अ‍ॅड. रसिक कोठेकर, सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version