पेण तालुका यात्रांनी गजबजणार

ग्रामीण भागात यात्रांची जय्यत तयारी सुरु

| हमरापूर | वार्ताहर |

चैत्र महिना सुरु झाला असून, लोकसभा निवडणुकीची धामधूमदेखील सुरु झाली आहे. तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तानंतर सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी आगरी-कोळी बांधवांची इष्टदेवता असणारी कार्ला येथील एकविरा देवीची यात्रा उत्सव झाल्यानंतर स्थानिक ग्रामदेवतांच्या यात्रांना सुरुवात होते.

पेण तालुक्यातील यात्रांना रामनवमीपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील वाशी, वढाव, बोरी, कळवा, रावे, दादर, जिते यांच्यासह अनेक ठिकाणच्या ग्राम यात्रा होत असून, मोठी गर्दी उसळणार आहे. यानिमित्ताने कोट्यवधींची उलाढाल दरवर्षी होते. तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या व प्रति अयोध्या म्हणून ओळखली जाणारी बळवली गावातील प्रभू श्रीरामांचे मंदिर असलेलली बळवली गावची यात्रा बुधवार, (दि.17) एप्रिल रोजी भरते. तालुक्यातून भाविक या दिवशी येथे मोठी गर्दी करतात.

वढाव येथील काळभैरव देवाची यात्रा ही (दि.21) एप्रिल रोजी भरणार आहे. तर, तालुक्यातील सर्वात मोठी असणारी वाशी येथील नवसाला पावणार्‍या वरसूबाय जगदंबा भवानी देवीची यात्रा सोमवारी (दि.22) एप्रिल रोजी भरत असून, ही यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. आकाश पाळणे, इतर मनोरंजन करणारे खेळ तसेच मेवा-मिठाईची दुकाने यांनी संपूर्ण परिसर गजबजलेला असतो. याच दिवशी गडब येथील काळबादेवीची येथील यात्रा भरणार आहे. बोरी येथील आक्कादेवीची यात्रा मंगळवारी (दि.23) एप्रिलला भरणार आहे. तसेच पांडापूर येथील यात्रादेखील याच दिवशी आहे. तर कळवे येथील यात्रादेखील हनुमान जयंतीच्या दिवशी आहे. तर, वरेडी येथील काळभैरव देवाची यात्रा (दि.25) एप्रिलला आहे. तर कोलेटी येथील यात्रा (दि.28) एप्रिल रोजी भरणार आहे.

रावे गावच्या आई रायबादेवीची यात्रा बुधवार, (दि.8) मे रोजी भरत असून, ही यात्रादेखील मोठी मानली जाते. भव्य काठ्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते. काठ्या उभ्या करतानाचे दृश्य पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी उसळते. जिते गावची सत्यनारायण देवाची यात्रा ही अक्षयतृतियेच्या दिवशी शुक्रवार, (दि.10) मे रोजी भरत असून, ही तालुक्यातील शेवटची यात्रा आहे. या यात्रेनंतर यात्रोत्सवाची समाप्ती होते.

Exit mobile version