1 एप्रिलपासून अंमलबजावणी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामाच्या ठिकाणी 28 नियम बनवले आहेत. या नियमांनुसार उघड्यावर कचरा जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अजूनही काही जण उघड्यावर कचरा जाळत असून प्रदूषणात भर टाकत आहेत. त्यामुळे नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून महानगरपालिकेने दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
उघड्यावर कचरा जाळल्याने त्यातून विषारी वायू, राखेचे सूक्ष्म कण हवेत पसरतात. त्याचा परिणाम हवेच्या दर्जावर होतो आणि श्वसनाचे आजार बळावतात. आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी आढळल्यास स्वच्छता उपविधी तरतुदीनुसार शंभर रुपये इतकाच दंड आकारला जात होता. दंडाची रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे नागरिकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यापुढे कोणी उघड्यावर कचरा जाळताना आढल्यास त्यास जागेवरच 1 हजार रुपये इतका दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे.





