। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
वैजापूर तालुक्यातील बिरोळा गावाजवळील वळण शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. ऋतुजा सचिन कर्डक (रा. तांदुळवाडी ता. गंगापूर), असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
ऋतुजा ही आपल्या आजोळी किरण सोनवणे यांच्याकडे आली होती. दरम्यान सायंकाळी ऋतुजा शेतातील अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला. त्यानंतर जखमी ऋतुजाला कुटुंबीयांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.