| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
फॉरेक्स ट्रेंडिंगमध्ये अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून चौघांची 28 लाख 40 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत सचिन बापू गुंजाळ याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर यादव हे करंजाडे सेक्टर 1 येथे राहत असून त्यांची ओळख सचिन गुंजाळ यांच्याशी झाली. यावेळी फॉरेस्ट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दर महिन्याला परतावा म्हणून चार ते सहा टक्के रक्कम देत असल्याचे समजले. त्यावेळी त्याने त्याचे फॉरेस्ट ट्रेंडिंगचे खाते दाखवले. यावेळी पैसे बुडाले तर लोकांचे पैसे कसे देणार, असे विचारले असता त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. ती विकून लगेच तो लोकांचे पैसे देईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवशंकर यांनी 1 लाख रुपये गुंतवले. त्यावेळी दर महिन्याला तो सहा टक्के परतावा देत होता. त्यामुळे शिवशंकर यांनी 6 लाख 82 हजार रुपये गुंतवले. मार्च 2024पर्यंत नियमित परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा मिळालाच नाही. सचिन गुंजाळ याने दरवेळी वेगवेगळे कारणे सांगितली. त्याला संपर्क केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्या नवीन कार्यालयाला भेट दिली असता त्याने वेगवेगळी कारणे सांगितली. त्याला फोन केले असता त्याने फोन उचलले नाही आणि मोबाईल नंबर ब्लैक लिस्टला टाकला. त्याच्या खारघर येथील कार्यालयाला भेट दिली असता ते ऑफिसही बंद केले होते. अशा प्रकारे शमा परवीन यांची 15 लाख रुपये, सुमित जा यांची 5 लाख 54 हजार रुपये व विलास कांबळे यांची 1 लाख 1 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले.






