जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचा शिरकाव

शाळांमध्ये आरोग्य विभाग करणार सर्वेक्षण

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यात डोळे येण्याची साथ अधिक वेगात पसरली नसली तरी या साथीच्या आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील डोळे येण्याचे रुग्ण 26 लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 346 इतकेच आहेत. ग्रामीण रायगड 167 आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रात 179 रुग्ण आढळले आहेत. डोळ्यांच्या साथीचा आजार वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे. डोळ्याच्या साथीचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण शाळांमध्ये अधिक आहे. यामुळे लवकरच आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून तातडीने इलाज करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या संसर्गाने त्रस्त करण्यास सुरुवात केली आहे. यात लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे ओपीडीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय असो, तिथं डोळ्यांच्या आजारासाठी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेकांना डोळे लाल होणे आणि डोळ्यांना सूज येणे असा त्रास होत आहे. डोळ्यांच्या खासगी रुग्णालयातील आणि शासकीय रुग्णालयातील नेत्र तज्ञांकडील रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

जिल्ह्यात ग्रामीण परिसरात डोऴयाच्या साथीचे 167 रुग्ण आढळले होते. तर पनवेल महानगर पालिका परिसरात 179 रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शाळांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यानं कुटुंबातील अनेकांना त्रास होत आहे. वातावरणातील बदलामुळे डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

अशी घ्या काळजी
वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
वारंवार हात धुणे
डोऴयांना स्पर्श करणे टाळणे
रुग्णांचे घरातच विलगीकरण
परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे

लक्षणे काय?
डोळे लाल होणे
डोऴयांतून वारंवार पाणी येणे
डोऴयांना सूज येणे
डोळ्याला खाज येणे
डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात डोळ्यांची साथ कमी प्रमाणात आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. साथ ग्रस्त भागात घरोघरी आणि जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. शाळेत आढळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी औषधेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version