पेणचे बाप्पा निघाले सातासमुद्रापार; 25 ते 30 लाख गणेशमूर्तीची विक्री

। खरोशी । धनाजी घरत ।
कोरोना, महागाई, लॉकडाऊन, कामगारांची कमतरता, तौक्ते व निसर्ग चक्रीवादळचा तडाखा, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरून गणेशमूर्तींचे नुकसान झाले होते. असे असतानाही पेण तालुक्यातील गणपती कारखानदारांनी चिकाटीने व्यवसाय करीत यावर्षी देखील सुमारे 25 ते 30 लाख बाप्पाच्यामुर्त्या तयार करून त्यांची विक्री केली आहे. त्यामुळे अनेक संकटातही ग्राहकांनी पेणच्या गणेशमूर्तींना पसंती दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दगडूशेठ हलवाई, टिटवाळा, पेशवाई, शिवरेकर, लालबागचा राजा, चिंतामणी, मोरेश्‍वर, अष्टविनायक, गरुडावर स्वार बाप्पा, खेकड्ययावर स्वार बाप्पा यासह इतर विविध प्रकारच्या गणेशमूर्तींंना ग्राहकांनी पसंती दिली आहे.

कॅम्लीन, वेलसन, पॉल्सन, एशियन, नेरोलॅक या कंपनीचे फ्लोरोसंट, इमल्शन, लेकर, क्रीलिक, गोल्डन मेटॅलिक, पर्ल या प्रकारचे कलर वापरण्यात येतात. त्याच्या किंमतीतही 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात मागील दोन वर्षात झालेल्या वाढीमुळे वाहतुकीचा खर्च 30 ते 40 टक्क्यांनी महागला आहे. तसेच मागील दोन वर्षात झालेल्या महागाईमुळे गणेशमूर्ती कारागीरांच्या पगारात ही 10 टक्के वाढ झाली असल्याने कोरोना महागाई, लॉकडाऊन, नैसर्गिक आपत्तीवर मात करून गणेशमूर्ती कारखानदारांनी विपरीत परिस्थितीचाही सामना करून आपली परंपरा कायम राखली आहे.

बँकांकडून सुमारे 150 कोटींचा पतपुरवठा
पेण तालुक्यात गणेश उद्योग हा मोठ्या प्रमाणावर असून बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांकडून गणेशमूर्ती कारखानदारांना सुमारे 150 कोटींचा पतपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पेण तालुक्यातील गणेशमूर्ती उद्योगाची उलाढाल सुमारे 250 ते 270 कोटींची होते.

देशासह परदेशात बाप्पाची वारी
पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे ,कळवा, तांबडशेत, शिर्की, बोरी, वढाव येथील कारखान्यात साकारण्यात येणार्‍या बाप्पाच्या मुर्ती महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये तर विराजमान होतातच याव्यतिरिक्त अमेरिका, थायलंड, दुबई, मॉरिशस, टेक्सास यासह इतर देशातही बाप्पांच्या मूर्तींना मागणी असल्याने यावर्षी सुमारे सव्वा लाख मुर्ती फॉरेनला रवाना झाल्या आहेत.

पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंती
ग्राहकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींना अधिक पसंती दिली असून त्यामुळे शाडू मातीच्या अनेक गणेशमुर्त्या विक्री विना पडुन राहिल्या आहेत. केंद्र सरकारच्या पीओपी मूर्तीवरील बंदीच्या धरसोड धोरणाचा फटका गणेशमुर्ती कारखानदारांना बसला आहे. पीओपीच्या मूर्ती या मातीच्या मूर्तीपक्षा वजनाला कमी व दिसायला आकर्षक असतात त्याचप्रमााणे त्यांची किंमतही कमी असते. तसेच हाताळण्यास व वाहतुकीसही योग्य असल्याने ग्राहकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंती दिली असल्याची माहिती कारखानदारांनी दिली.

एसटी व कोकण रेल्वे बंदचा फटका
कोरोनाामुळे पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी बंद असल्याने ग्रामीण भागात असलेले कारागीर पेण शहरातील कारखान्यांमध्ये येऊ शकत नव्हते. त्यामुळे अनेक गणेश मूर्ती कारखानदारांच्या घरातील सदस्यांनी पुढाकार घेऊन गणेशमूर्ती साकारल्या आहेत. कोकण रेल्वे बंद असल्याने रेल्वेमधून कोकणात जाणार्‍या हजारो मुर्ती यावर्षी कोकणात गेल्याच नाहीत त्यामुळे गणेशमूर्ती कारखानदारांना 20 ते 25 लाखांचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने कोकणात जाणार्‍या रेल्वेला पेणला थांबा द्यावा व कोरोनामुळे बंद केलेली कोकण रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी गणेशमूर्ती कारखानदार संघटनेनी केली आहे.

बाप्पाच्या मूर्ती 30 ते 40% नी महागल्या
महागाईचा फटका बाप्पांच्या मूर्त्यांनाही बसला असून यावर्षी बाप्पाच्या मुर्त्या 30 ते 40 टक्क्यांनी महागल्या आहेत. गणेशमूर्तींसाठी लागणारी पीओपी व शाडू माती गुजरातवरून मागविण्यात येते. दोन वर्षांपूर्वी पीओपीची एक गोण 120 रुपयांना मिळायची. त्याची किंमत वाढून सध्या 150 रुपयांना मिळते. या गोणीतून बाप्पांच्या 1 फुटाच्या 10 ते 12 मुर्त्या साकारता. तर शाडू मातीच्या एका गोणीची किंमत दोन वर्षांपूर्वी 130 होती आज मात्र ती महाग होऊन 160 झाली आहे. एक गोणी शाडू मातीतून 1 फुटाच्या केवळ 7 ते 8 बाप्पाच्या मूर्ती साकारतात.

Exit mobile version