। पेण । वार्ताहर ।
राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा इंदौर येथे दि. 21 ते 27 जुलै या कालावधीत संपन्न होत आहेत. मास्टर्स पुरुष 4 (70 वर्षावरील) या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघात रायगड जिल्ह्याचे पेणच्या हनुमान व्यायाम शाळातील रमेश उर्फ आप्पा खरे यांची 66 किलो वजनी गटासाठी निवड झाली होती. त्यांची स्पर्धा ही दि. 22 जुलै रोजी संपन्न झाली असून या स्पर्धेत ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू रमेश खरे (75) यांनी एकूण 205 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे.
रमेश खरे यांनी स्कॉट या प्रकारात 66 किलो, बेंच प्रेस प्रकारात 55 किलो आणि डेडलीफ्ट प्रकारात 90 किलो असे एकूण 205 किलो वजन त्यांनी उचलले.
याबद्दल त्यांना गटातून पहिले आणि इतर प्रकारात ही पहिले अशी एकूण चार सुवर्णपदक प्राप्त झाली आहेत.
हेड मेकॅनिक म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामधून सेवानिवृत्त झालेले रमेश खरे हे हनुमान जिमचे संचालक, राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग पदक विजेते राजेश अंनगत आणि मयुरा अंनगत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. तसेच ते शरीरसौष्ठव पंच असून रायगड संघटनेवर कार्यरत आहेत. त्यांच्या सुवर्णपदकाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, सुभाष भाटे, सचिन भालेराव, राहुल गजरमल, संदीप पाटकर, सुभाष टेंबे, दत्तात्रय मोरे, यशवंत मोकल, माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.