दरड कोसळण्याच्या धास्तीने लोक भयभीत

| वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील बीड खुर्द हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या डोंगराची तीन ते चार ठिकाणी दरड कोसळून मोठमोठे दगड खाली येऊन घरांवर पडता पडता राहिल्याने फार मोठी जीवितहानी होण्यापासून टळली आहे. तर काही लोकांच्या घरामध्ये डोंगराची माती, चिखल वाहून आल्याने लोक भयभीत झाले असून दरडीचा काही भाग पाइपलाइनवर कोसळल्याने येथील पाइपलाइन फुटली असून येथील लोकांवर भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. दरड कोसळली तेव्हा लगेचच खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, ग्रामपंचायत प्रशासन यांनी भेट दिली परंतू दरड, चिखल, माती आणि पाणी घुसून घरांचे नुकसान झाले असूनदेखील त्यांना मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नसून आम्हाला लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावे अशी येथील लोकांकडून मागणी होत आहे. महाडमध्ये झालेल्या तळीये, पोसरे या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्यामुळे लोक आधीच घाबरलेले असताना हे डोंगर कधीही कोसळेल या भीतीने येथील लोक जीव मुठीत धरून राहत असलेले पाहायला मिळत असून आम्हाला येथून लवकरात लवकर स्थलांतरित करून आमचे पुनर्वसन करा असे येथील महिला,अबाल, वृद्ध करत आहेत.

Exit mobile version