जीवघेण्या खड्ड्याने जनता बेजार

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली-खोपोली राज्यमहामार्ग मागील अनेक वर्षांपासून मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे. या महामार्गावर आजवर अनेक जीवघेणे अपघात होऊन हजारो निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका प्रवासी व वाहनचालक यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. महामार्गावर सध्या ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. खडी, दगडगोटे व चिखलाने तर रस्त्याची भयावह अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डयांनी जनता अक्षरशः बेजार झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना पाली-खोपोली हा राज्यमहामार्ग आहे की डोंगर कड्या कपारीची वाट आहे, असा संताप प्रवासी वर्गासह स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

हा रस्ता खस्ता खात असताना शासन, राज्यकर्ते, एमएसआरडीसी प्रशासन व ठेकेदार मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. वाकण-खोपोली राज्यमहामार्ग 39 किमी इतका लांबीचा असून या रस्त्याचे काम 2016 पासून सुरू आहे. मात्र, आजतागायतया रस्त्याची दुरावस्था पाहता रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांवर खड्ड्यांचे विघ्न ओढावले आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कृषीवलच्या प्रतिनिधींनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे जनता संकटात असताना हा विभाग नेमका कुणाच्या नियंत्रणात काम करतो? अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर राज्य सरकाराचा वचक आहे की नाही? असा सवाल देखील जनतेतून उपस्थित होत आहे.

Exit mobile version