दूर दुरून आलेले लोक कित्येक तास ताटकळत…
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पहिल्यांदाच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील लोकांची गार्हाणी ऐकावीशी वाटली. म्हणूनच जनता दरबाराचे आयोजन केले गेले. खरंतर जनता दरबार हा जनतेसाठी होता. मग जनता ताटकळत दरबार घेणाऱ्याची वाट पाहत होती आणि पालकमंत्र्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र सभागृहात निवांत बसले होते. जनतेसाठी जर जनता दरबार घेतला असेल तर त्यांच्यावर तासनतास वाट पाहण्याची वेळ का यावी. मग याला खरंच जनतादरबार म्हणायचा का, हा ही प्रश्न पडतो.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या दुसऱ्या दौऱ्यात मंत्री महोदयांनी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा नियोजन भवन सभागृहात चक्क जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. ज्यांना ज्यांना ज्या ज्या समस्या असतील त्या घेऊन जनता दरबारात आपली गाऱ्हाणी मांडावी असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात हजेरी लावली. पण या जनतेला बसायला जागाही तिथे नव्हती. ज्या सभागृहात हा जनता दरबार घेतला गेला होता, तेथे मोठ्या संख्येने आलेल्या पालकमंत्र्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जागा अडवून बसले होते. जनता मात्र सभागृहाच्या आवारात आत बोलावण्याची वाट पाहत होती. आतमधून बघायचं म्हटलं तर कुणालाही प्रवेश नव्हता. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तक्रारी घेऊन आलेल्या जनतेचे अर्ज आधीच घेऊन ठेवले होते. साहेब आले आणि अर्ज वाचून त्या त्या लोकांचे नाव पुकारले गेले. ज्यांची नावे घेतली त्यांनी येऊन गाऱ्हाणे मांडायची आणि दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. आलेल्या अनेकांसाठी हा जनता दरबार काहीतरी वेगळाच होता.
खरंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना साधी बसण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. त्यातही पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र निवांत गार वाऱ्यात बसले होते. आता नाव जनता दरबार आणि या दरबारात जनताच नसेल तर खरंच हा जनता दरबार होता कि पक्षाचा दरबार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. केवळ कुळाचार किंवा औपचारिकता करण्यासाठी जर अशा दरबारांत आधार घेतला जात असेल, तर हे काम तालुक्याच्या ठिकाणीही पालक मंत्री महोदयांच्या सांगण्यावरून अधिकारी करू शकतील? मग हा एवढा उपद्व्याप करण्याची गरज काय?