जनता सज्ज आहे…

कर्नाटकात भाजपला जबरदस्त दणका बसला आहे. गेल्या वेळच्या निवडणुकांनंतर राज्यात काँग्रेस आणि देवेगौडांचे जनता दल यांचे संयुक्त सरकार आले होते. पण भाजपने फोडाफोडी करून आमदार पळवले आणि पुढची चार वर्षे तो पक्ष सत्तेत राहिला. इतके करूनही त्याला आपल्या राज्यकारभाराची छाप पाडता आली नाही. तेव्हा हिजाब आणि बजरंगबलीसारखे मुद्दे घेऊन हिंदू विरुध्द मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला. हे प्रयत्न करणार्‍यांना कानडी जनतेने सणसणीत श्रीमुखात वाजवली आहे. काल बंगालमध्ये ममतांची तृणमूल होती. आज कर्नाटकात काँग्रेस आहे. एकूणच भाजपच्या विरोधात उभ्या राहणार्‍या ज्या शक्ती आणि पक्षांविषयी भरवसा वाटेल त्यांना जनता योग्य वेळ येताच पूर्ण समर्थन द्यायला तयार असते हे दिसून आले आहे. भाजपला विरोध करायला जनता तयार आहे, आता देशातील नेते व राजकीय पक्षांनी तिच्यासोबत उभे राहायला हवे हाच या निकालांचा बोध आहे. आज विजय मिळवलेल्या काँग्रेसमध्ये उद्या कदाचित भांडणे सुरू होतील, मुख्यमंत्रिपदावरून तणातणी होईल, आणखी काही महिन्यांनी भाजप कदाचित हेही सरकार पाडण्याचा प्रयत्न करील. कारण, 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी जास्तीत जास्त राज्य सरकारे आपल्या बाजूला आहेत हे दाखवायचे असेल. पण भविष्यात असे झाले तरीही तेरा मे 2023 रोजी जनतेने दिलेला संदेश नष्ट होऊ शकणार नाही. भाजपने कितीही पैसे ओतले आणि लोकांच्या मनात धर्माचे विष कालवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही या देशातील जनतेला मूर्ख बनवता येणार नाही हा तो संदेश आहे. ही जनता योग्य वेळ येताच आपले मत मतपेटीद्वारे व्यक्त करतेच असाही त्याचा अर्थ आहे. दिवसरात्र वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियामधून प्रचार केल्यामुळे जिकडेतिकडे सर्वत्र भाजपचे भक्त असल्याचे चित्र निर्माण झाले तरी ते पूर्णपणे फसवे असते हेही या निकालामुळे स्पष्टपणे दिसले आहे.
मोदी-शहांचा पराभव
नेहमीप्रमाणे भाजपने आपल्या भात्यातील सर्व अस्त्रे या निवडणुकीत वापरली. गृहमंत्री अमित शाह गेल्या सहा महिन्यांपासून विविध निमित्ताने येथे येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीन-चार वेळा भेटी दिल्या. शेवटच्या टप्प्यात वीस सभा घेतल्या. गेल्या 75 वर्षात देशाच्या पंतप्रधानाने एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी इतका प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ असावी. बंगळुरूसारख्या जगप्रसिध्द आयटी कंपन्याची मुख्यालये असणार्‍या शहरातल्या लोकांची कित्येक तास अडवणूक करून मोदींनी एक रोड शो केला. त्याची सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रचंड जाहिरात केली. काँग्रेसने मला आजवर 91 शिव्या दिल्या असा हास्यास्पद आरोप मोदींनी केला. बजरंग दलासारख्या संघटनांवर बंदी घालू असे आश्‍वासन काँग्रेसने दिल्यावर हनुमानाचा अपमान झाल्याचा कांगावा मोदींनी सुरू केला. मतदान करताना जय बजरंगबली म्हणा अशी बाष्कळ चिथावणी देऊन झाली. काँग्रेसने आजवर लिंगायत समाजावर अन्याय केल्याची आवई उठवण्यात आली. पण इतका सर्व विषारी आणि खोटा प्रचार भाजपला तारू शकला नाही. किंबहुना, जनतेला या सर्वांचा उबग आला असावा. त्यामुळेच आज काँग्रेसला भाजपच्या दुपटीहून अधिक जागा मिळाल्या आहेत. मुंबई कर्नाटक या नावाने ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रालगतच्या बेळगाव, कारवार, हुबळी, धारवाड, मंगलोर, उडीपी इत्यादी भागात भाजप प्रचार न करतादेखील निवडून येऊ शकतो असे म्हटले जात असे. पण तिथेच या पक्षाला मोठा फटका बसला. हा उत्तरेचा तसेच मध्य कर्नाटकाचा भाग हा लिंगायत समाजाचा बालेकिल्ला. काँग्रेसकडे येडियुरप्पांसारखा नेता नसूनही या भागात त्यांनी मोठे यश मिळवले. म्हैसूर कर्नाटकामध्ये देवेगौडांच्या वोक्कलिग समाजाचा प्रभाव आहे. पण तिथेही काँग्रेसने मुसंडी मारून जनता दलाच्या जागा आपल्याकडे खेचून घेतल्या. अगदी बंगळुरूसारख्या शहरी भागातही काँग्रेसने भाजपच्या तोडीस तोड यश मिळवले. मुस्लिम समाजही काँग्रेसच्या मागे उभा राहिला. थोडक्यात समाजाच्या सर्व थरातून काँग्रेसला पाठिंबा मिळालेला आहे.
मोकळा श्‍वास
दक्षिण भारतात शिरकाव करण्याचे प्रवेशद्वार म्हणून भाजप कर्नाटकाकडे पाहत असतो. पण कर्नाटक म्हणजे मागास उत्तर प्रदेश नव्हे हे आता त्याला कळले असेल. हिजाबपासून केरळ स्टोरीपर्यंत सतत मुस्लिमद्वेषाचे राजकारण करून आपल्याला लोक मते देतील हा भाजपचा भ्रम आता तरी दूर व्हावा. वाढती महागाई, बेरोजगारी हे प्रश्‍न लोकांना महत्वाचे वाटत असल्याचे विविध सर्वेक्षणांमध्ये दिसले होते. याबाबत भाजपकडे काहीही उत्तरे नव्हती. सर्वात निर्णायक ठरला तो भ्रष्टाचाराचा मुद्दा. भाजपच्या नेत्यांना प्रत्येक कामात चाळीस टक्के दलाली द्यावी लागते असा जाहीर आरोप कंत्राटदारांच्या संघटनेने गेल्या वर्षी केला होता. बेळगावच्या एका कंत्राटदाराने यापायी आत्महत्याही केली. तरीही यात फरक झाला नाही. भाजप नेत्यांची मस्ती इतकी, की काँग्रेसच्या राजवटीत 85 टक्के भ्रष्टाचार होता असा आरोप मोदींनी केला. त्यांच्यापेक्षा आम्ही कमीच भ्रष्टाचारी आहोत असे सांगण्याचा हा प्रयत्न होता. न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणार्‍या नेत्याची ही अवस्था! काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात गरिबांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. शिवाय त्यांचे नेते एकदिलाने लढले. केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकाचेच असल्याचाही फायदा झाला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनेही वातावरणनिर्मिती केली. शिवाय, इंदिराअम्मांच्या काळापासून हे काँग्रेसला अनुकूल असलेले राज्य आहे. तेव्हा रायबरेलीतून हरल्यावर इंदिराजी चिकमगळूरमधून विजयी झाल्या होत्या. सोनिया गांधीदेखील बल्लारीमधून लोकसभेवर गेल्या होत्या. आता येत्या वर्षभरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा इत्यादी राज्ये आणि लोकसभा यांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्र व ओरिसाच्या निवडणुकाही पाठोपाठ होतील. या सर्व राज्यांमध्ये काँग्रेसलाच नव्हे तर भाजपविरोधी पक्षांना उभारी मिळेल असा हा विजय आहे. या देशातील राजकारण भाजपने एका कोंडवाड्यात अडकवले आहे. त्यातून बाहेर पडून मोकळा श्‍वास घेण्याचा मार्ग कन्नड जनतेने दाखवला आहे. त्यापासून धडा घेण्याची जबाबदारी इतर राज्यांची व पक्षांची आहे.  

Exit mobile version