वाढत्या उकाड्याने जनता हैराण

ज्युस, शीतपेय, कलिंगडांना वाढती मागणी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

मार्च महिना सुरु होताच खर्‍या अर्थाने उन्हाळा सुरु झाला असून, त्यात ढगाळ वातावरण यामुळे तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जनता हैराण झाली असून, उष्णतेपासून थंडावा मिळावा यासाठी ज्यूस, शीतपेय, कलिंगड यांना जनता अधिक पसंती देत असल्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे.

वाढते प्रदूषण, प्रचंड वृक्षतोड व दररोज लावण्यात येणारे वणवे यामुळे जंगले ओस पडू लागली असून, यामुळे दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या वातावरणामुळे जनता पूर्णपणे हैराण झाली आहे. यामुळे शरीराचा दाह कमी करण्यासाठी ज्यूस, शीतपेय, कलिंगड खरेदी करण्याकडे जनतेचा कल वाढताना दिसत आहे.

चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, यामुळे उन्हाचा पारा वाढला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत असून, यामुळे रस्तेही आग ओकताना दिसत आहेत. यामुळे दाहक परिस्थितीचा बचाव करण्यासाठी नागरिक थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस, कलिंगड याचा आधार घेत आहेत.

मुरूडचा पारा चढला; उष्णतेच्या काहिलीने नागरिक हवालदिल

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

भारतीय हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी भागात शनिवारी उष्णतेची मोठी लाट आली असून, तापमान 39 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. उष्णतेच्या प्रचंड काहिलीने नागरिक घामाघूम आणि हवालदिल झाले आहेत.

मुरूड तालुक्यातदेखील उष्णतेची मोठी लाट असून, समुद्रकिनारपट्टीतदेखील उष्ण वारे वाहात आहेत. रस्त्यावरून जाताना गरम वाफा डोळे आणि चेहर्‍यावर येत असल्याने बाहेर फिरणे अवघड झाल्याची माहिती कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते मनोहर बैले यांनी दिली. त्यामुळे दुपारी बाजारपेठांमध्येही सामसूम दिसून येत आहे. ही लाट आगामी दोन ते तीन दिवस राहील, असे सूचित करण्यात आले आहे. मुरूड तालुक्यात तापमान 38 ते 39 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. अति उष्णतेमुळे आजारपण वाढण्याची शक्यता वाढली आहे. वृद्ध आणि मुलांना वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ शकतो. डोळ्यांनादेखील याचा मोठा त्रास होतोय, अशी माहिती पांडुरंग पाटील, रा. सावली यांनी दिली. यापेक्षा अधिक प्रमाणात उष्णता वाढल्यास उष्माघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांनी घरीच बसणे पसंत केले आहे. उष्णतेमुळे शहाळी, लिंबू सरबत, शीतपेयांना मागणी वाढली आहे.

Exit mobile version