‘आनंदाचा शिधा’च्या जनता प्रतीक्षेत

ऐन दिवाळीतही ताटकळत बसण्याची वेळ
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त स्वरूपात व फक्त 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल असा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. राज्यातील सात कोटी शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल, असं सांगण्यात आलं. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला 513 कोटी रुपयांचं याकरिता कंत्राटदेखील देण्यात आलं. मात्र, दिवाळी सुरू झालेली असतानादेखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानात रविवारपर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेला नाही. रेशन धान्य दुकानदाराने यासाठी पैशाचादेखील भरणा शासनाकडे भरला, त्यामुळे धान्य दुकानदारांसह रेशनधारकही या आनंदाच्या शिधा किटकडे डोळे लावून बसले आहेत.

दिवाळी सणासाठी शिधा किट स्वस्त आणि मस्त मिळणार या आनंदात सारे धारक डोळे लावून बसले आहेत रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात हे किट पोहचले तर त्याच बरोबर रोहा तालुक्यात देखील काही दुकानदारांकडे अर्धवट स्थितीत पोहचल्याचे समजले तर तर काही अति दुर्गम आणि ग्रामीण भागात हे शिधा किट न पोहचल्याने केवळ येथील धान्य दुकानदाराने नेहमी प्रमाणे तांदूळ आणि गहू देत शिधा किट आले नसल्याचे सांगत माघारी धाडले तर ते आल्यानंतर मिळतील असे काहीजण बोलत आहेत.

सोमवारी रेशनधान्य दुकाने बंद तर दिवाळी असल्याने सरकारी अधिकारी वर्ग देखील सुट्टीवर मंगळवारी पाडवा तर बुधवारी भाऊबीज त्यामुळे फराळाचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमधे 100 रुपयांत मिळणारा आनंदाचा शिधा घेण्यासाठी पोहोचत आहेत. फक्त शंभर रुपयांमधे रेशनधान्य दुकानात मिळणारे शिधा किट घेऊन गोड दिवाळी साजरी करण्यात येईल याच प्रतीक्षेत राहिल्या. मात्र ते किट त्यांच्या घरात वेळेवर न पोहचल्याने मोठी निराशा झाली असल्याचे दिसून येत आहे.

रोहा तालुक्यातील काही दुकानातून हे शिधा किट शिधापत्रिकाधारकांना मिळाले तर काही दुकानात पोहचलेच नाहीत, त्यामुळे काहींना मिळालेच नाहीत. याचे कारण समजू शकले नाही, परंतु आजदेखील ते धारक प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे. तर दिवाळी संपल्यावर ही किट या दुकानात उपलब्ध केल्याने त्याला दिवाळी सणाच्या आनंदाचा गोडवा येईल का, असा प्रश्‍न काही शिधापत्रिका धारकांना पडला आहे.

शिधा मिळणार कधी?
10 ऑक्टोबरपासून हा शिधा थेट रास्त धान्य दुकानात मिळेल असं आधी जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर ही तारीख वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली. ती देखील उलटली आज 24 तारीख उजाडली आनंदाचा दिवाळी गोड करणारा शिधा दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. गृहिणी दुकानांमध्ये दररोज शिधा आला का? म्हणून चौकशी करत आहेत तर जाहीर केलेला शिधा किट मिळेल की नाही याची शाश्‍वती नाही. पण, त्यांना मोकळ्या पिशवीसह परतावं लागतय. त्यामुळे दिवाळीच्या आधी की नंतर हा शिधा आपल्याला मिळेल का, हा प्रश्‍न त्यांना पडला असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version