| उरण | वार्ताहर |
उरण शहराबरोबरच खोपटा पूल ते कोप्रोली, दिघोडे नाका ते चिर्ले या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी याचा त्रास हा नोकरदार, विद्यार्थी, रुग्णांना सहन करावा लागत असून, रस्त्यावरुन मार्गक्रमण करणारे नागरिक आणि वाहन चालक वैतागले आहेत. तरी, उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी या मार्गावरुन प्रवास करुन ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी उरण नगर परिषद अयशस्वी ठरली आहे. त्यात उरण तहसील, उरण पंचायत समिती या कार्यालयांच्या अधिकारी वर्गाने उरणवासियांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी खोपटा पूल ते कोप्रोली, दिघोडे नाका ते चिर्ले आणि विंधणे ते गव्हाण फाटा या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून, ही वाहतूक कोंडी लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जड वाहनांसह येथे चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. वेडीवाकडी वाहन चालविणारे दुचाकीस्वार, एकेरी मार्गातून उलट दिशेने येणारे चालक यामुळेही येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्या कोंडीचा सामना उरणवासियांना करावा लागत असून, अबालवृद्धांबरोबर महिलांना रस्ता ओंलाडणेही कठीण बनले आहे.