। पेण । प्रतिनिधी ।
सेझच्या काळात ज्यांनी शेतकर्यांची बाजू न घेता दलाली केली, शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या व स्वतःच्या जमिनी अबाधित ठेवल्या अशांना जनता आता दरात उभेही करणार नाही. शेतकर्यांचे हित बघणारा खारेपाटातील जनतेला लोकप्रतिनिधी हवा आहे. स्वार्थी लोकप्रतिनिधी जनता स्वीकारणार नाही, असे टीकास्त्र सोडत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार रवीशेठ पाटील आणि त्यांच्या चिरंजीवाचा खरपूस समाचार घेतला.
महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचाराचा नारळ वाशी येथील जगदंबा मंदिरात गुरुवारी (दि. 7) शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते वाढवून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणारी ही मंडळी आहेत. अशांना मतं द्यायची नाहीत. ज्यांचा पोरगा उमेदवारी नको म्हणून सांगतोय, त्यांना उमेदवारी करण्याचा नैतिक अधिकार आहे का? अशी संस्कृती असते का कुठे? तर आपणच विचार करा किती तो स्वार्थीपणा या मंडळींना खारेपाटाशी किंवा मतदारांशी काहीही घेणे देणे नाही. तसेच शिवसेनेचे उमेदवार प्रसाद भोईर यांचे नाव न घेता आज इथे, उद्या तिथे अशा पक्ष बदलणार्यांना जनता स्वीकारेल का, असा सवालदेखील त्यांनी केला. उमेदवार अतुल म्हात्रे यांनी येणार्या एमएमआरडीमध्ये शेतकर्यांची कशाप्रकारे कशी दिशाभूल केली जाणार आहे, याबाबत भाष्य करुन भविष्यात शेतकर्यांनी कशाप्रकारे संघटित राहायला हवेय याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सभापती महादेव दिवेकर, उपसभापती सविता पाटील, निलेश म्हात्रे, महेंद्र ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.