खुशखबर! रायगड जिल्ह्यातील जनतेला मिळणार महत्वपूर्ण ऑनलाईन सुविधा

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

रायगड जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा पुरविता येतील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विविध ऑनलाईन सुविधा सुरू केल्या असून, त्यासोबतच नागरिकांना एखादी योजना राबविताना किंवा एखादी समस्या दिसल्यास ती मांडण्यासाठी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व ऑनलाईन प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रायगड जिल्हा परिषदेचे कामकाज गतिमान होण्यासाठी तसेच नागरिकांना घरबसल्या सुविधा पुरविण्यासाठी विविध ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाईन घरपट्टी भरणा प्रणाली, अमृतग्रम डिजिटल कर प्रणाली, कंत्राटदार ई-नोंदणी, ई-कामवाटप नोंदणी प्रणाली, अमृतग्राम कार्यक्रम नोंदणी प्रणाली, अमृत नावीन्यपूर्ण संकल्पना प्रणाली, निवृत्तीवेतन धारकांसाठी अमृत प्रणाली अशा विविध ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

या ऑनलाईन प्रणालींमुळे कामकाजात सुसूत्रता येण्यासोबत कामकाज गतिमान झाले आहे. याचबरोबर नागरिकांना एका क्लिकवर अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांना आपली घरपट्टी तसेच इतर कर ऑनलाईन पद्धतीने भरणे सुलभ झाले आहे. तसेच कंत्राटदार ई-प्रणालीमुळे कुठलाही कंत्राटदार आपली नोंदणी ऑनलाईन करू शकतो. यामुळे जिल्ह्याबाहेरील ठेकेदार नोंदणी करू लागले आहेत.

तसेच कामवाटप प्रणालीमुळे कुठे कोणते काम सुरू आहे, याची माहिती सहज खुली झाली आहे. इतर प्रणालींमुळे नागरिकांना आपल्या भागातील समस्या, तसेच एखादी योजना राबविण्यासाठी आपल्या कल्पनेतील नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविणे सोयीचे झाले आहे. तसेच निवृत्ती वेतन धारकांसाठी अमृत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

ऑनलाईन प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होणार आहे. नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ ऑनलाईन घेणे सोयीचे ठरणार आहे. यामुळे त्यांच्या वेळेची बचत होईल. यामुळे ग्रामपंचायतींची कर वसुली वाढण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना प्रशासनाकडे मांडण्याची ऑनलाईन सोयही उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व सेवांचा लाभ घ्यावा.

– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

Exit mobile version